

वडगाव शेरी: लष्कर जलकेंद्रातून वडगाव शेरी, खराडी परिसरासाठी 70 एमएलडी पाणी सोडण्यात येते, तरीदेखील या परिसरामध्ये पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे. पाणीपुरवठा विभागाकडून पाण्याचे वितरण चुकीच्या पद्धतीने होत असल्याने कृत्रिम पाणीटंचाईची समस्या भेडसावत असल्याचे दिसून येते. पाणीवाटपाचे ऑडिट करण्याची मागणी येथील नागरिक करत आहेत.
वडगाव शेरी, विमाननगर, चंदननगर, खराडी या भागांतील नागरिकांना लष्कर जलकेंद्र आणि भामा आसखेड जलकेंद्रातून पुरेसा पाणीपुरवठा केला जात आहे. वडगाव शेरी, खराडीत समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत नव्याने पाइपलाइन टाकण्यात आल्या आहेत. तसेच, पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या आहेत. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची कामे करण्यात आली आहेत.
तरी, गेल्या काही महिन्यांपासून वडगाव शेरी, खराडी, विमाननगर परिसरामध्ये पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे. नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. सोसायट्यांना टँकरसाठी लाखो रुपये खर्च करावे लागत आहेत. यापूर्वी पाणीटंचाईची समस्या एवढी गंभीर नव्हती. पण, पाणीपुरवठा विभागाच्या वितरणव्यवस्थेतील गोंधळ, पंपिंग स्टेशनवरील पाण्याची चोरी, यामुळे कृत्रिम पाणीटंचाई होत आहे.
माजी नगरसेविका श्वेता गलांडे यांनी सांगितले की, वडगाव शेरीला दररोज 70 एमएलडी पाणीपुरवठा होत आहे. पण, वडगाव शेरी आणि खराडीतील पाण्याच्या टाक्यावरील फ्लो मीटर बंद असल्याने पाणीवितरण किती केले, याची माहिती मिळत नाही. पाणी वितरणव्यवस्थेतील दोष शोधावे, पाण्याची चोरी थांबविण्यासाठी उपाययोजना कराव्यात.
माजी स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी पाणीपुरवठा विभागाकडून वितरण होणार्या पाण्याचे ऑडिट करण्याची मागणी केली आहे. वडगाव शेरीमध्ये पाण्याचे वाटप चुकीच्या पद्धतीने का होते? याची चौकशी करण्याची गरज आहे. यासंदर्भात बंडगार्डन पाणीपुरवठा अधिकारी एकनाथ गाडेकर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही.