

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या गुरुवारी (दि. 26) शिवाजीनगर ते स्वारगेट भुयारी मेट्रो मार्गाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान या भुयारी मेट्रो मार्गाने थेट स्वारगेटपर्यंत प्रवास करणार असून, त्यानंतर स. प. महाविद्यालयाच्या मैदानावरील सभेला जाणार आहेत.
पंतप्रधानांच्या हस्ते शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गाचे उद्घाटन आणि स्वारगेट ते कात्रज या मार्गाचे भूमिपूजन होणार आहे. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी पुणे विमानतळावरून शिवाजीनगर येथे येणार आहेत. सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशन येथे स्वारगेटकडे जाणार्या भुयारी मेट्रोला हिरवा कंदील दाखवून या प्रकल्पाचे उद्घाटन ते करतील. विशेष म्हणजेच याच मेट्रोने स्वारगेटपर्यंत पंतप्रधान प्रवास करणार आहेत. स्वारगेटला आल्यानंतर त्यांच्या हस्ते स्वारगेट ते कात्रज या मेट्रो मार्गाचे भूमिपूजन होणार आहे. हा कार्यक्रम झाल्यानंतर स. प. महाविद्यालय येथे पंतप्रधान मोदी यांची सभा होणार आहे. अशा पद्धतीने त्यांचा पुणे दौर्याचा कार्यक्रम असेल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.