

Pimpri News: देशातील काँग्रेस सरकारच्या 60 वर्षांच्या राजवटीत देशातील कामगार वर्गाची मोठ्या प्रमाणात पिळवणूक करण्यात आली. काँग्रेसच्या विकासाच्या अजेंड्यावर देशातील सर्वसामान्य कामगार वर्ग कधीच नव्हता.
मात्र, ज्या वेळी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे सरकार आले त्या वेळी कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवून खर्या अर्थाने देशातील कामगारांना न्याय आणि सन्मान देण्याचे काम मोदी सरकारने केले, असे प्रतिपादन गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.
चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप- शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-रिपाइं (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या पाठिंब्यासाठी वाल्हेकरवाडी येथील शुभम गार्डन याठिकाणी शहरातील कामगार/उद्योजकांच्या संवाद स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाकोडकर, कार्याध्यक्ष शत्रुघ्न काटे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी उपमहापौर केशव घोळवे, माजी उपमहापौर सचिन चिंचवडे, कामगार आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष गोरख धोत्रे, कामगार नेते विलास सपकाळ, माजी नगरसेवक चंद्रकात नखाते यांच्यासह हजारो कामगार उपस्थित होते.