

Pune APMC leadership election results
पुणे: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी प्रकाश जगताप यांची बिनविरोध निवड झाली. दुसर्यांदा सभापती होण्याचा मान त्यांना मिळाला आहे. यापूर्वी 16 मार्च 2001 ते 10 फेब्रुवारी 2003 मध्ये त्यांनी सभापतिपद भूषविले आहे.
प्रशासकीय राजवटीच्या वीस वर्षांनंतर 9 मे 2023 मध्ये बाजार समितीची निवडणूक झाली. त्यानंतर दिलीप काळभोर सभापती झाले. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर ही सभापतीची निवडणूक लागली होती. शुक्रवारी (दि. 18) झालेल्या निवडणुकीत 18 संचालकांकडून सभापतिपदासाठी प्रकाश जगताप यांचा एकमेव अर्ज आला. (Latest Pune News)
त्यामुळे, त्यांची बिनविरोध निवड झाली. जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. सभापतिपदी निवड झाल्यानंतर बाजार समिती परिसरात जगताप यांच्या समर्थकांनी गुलाल उधळत व फटाके फोडून जल्लोष साजरा केला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी जगताप यांच्यावर शुभेच्छांचा वर्षावही केला.
निवड झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना जगताप म्हणाले, माझ्या मागील कार्यकाळात समितीचे 8 कोटी उत्पन्न होते. त्यानंतर 40 वस्तूंचे नियमन केले. त्यामुळे समितीचे उत्पन्न 35 कोटींवर पोचले. दोन वर्षांपूर्वी बाजार समितीचे उत्पन्न 80 कोटी रुपये होते. ते सध्या 106 कोटींवर गेले आहे. बाजार समितीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. येत्या काळात शेतकरी व व्यापार यांच्यात समन्वय ठेवून सेसगळती रोखण्यासाठी प्रयत्न केले जातील. दर वर्षी 5 ते 10 टक्के उत्पन्नवाढीचे उद्दिष्ट ठेवून काम केले जाणार आहे.
पणन संचालकांनी लावलेली चौकशी चुकीची
आम्ही निवडणुकीच्या धामधुमीत होतो. त्यामुळे बाजार समितीत झालेल्या गैरव्यवहाराच्या आरोपांबाबत कल्पना नाही. त्याअनुषंगाने आम्ही सर्व एकत्रित येऊन त्याच्यावर विचारविनियम करून उत्तर देऊ, पणन संचालकांनी 51 मुद्द्यांवर लावलेली चौकशी चुकीची असल्याचा आमचा दावा आहे. बाजार समितीवर झालेले सर्व आरोप हे राजकीय प्रेरणेतून झालेले आहेत.