पौड आयडीबीआय बँकेत सुमार दर्जाची सेवा; खातेदारांच्या तक्रारी वाढल्या

बँकिंग कामकाजाबाबत खातेदारांच्या तक्रारी वाढल्या
Paud News
पौड आयडीबीआय बँकेत सुमार दर्जाची सेवा; खातेदारांच्या तक्रारी वाढल्या Pudhari
Published on
Updated on

पौड: बँका ग्राहकांना सेवा देण्यासाठी असतात असा जनमानसाचा समज आहे. परंतु, पौड (ता. मुळशी) येथील आयडीबीआय बँकेत कर्मचारी संख्या अपुरी असल्याने कार्यरत कर्मचार्‍यांवर कामाचा ताण येतो. त्यातून ग्राहकांना मिळणारी वागणूक आणि सुमार दर्जाच्या सेवेमुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

पौड आयडीबीआय बँकेत केवळ शाखा व्यवस्थापक, बहुउद्देशीय कर्मचारी, रोखपाल असे दोन कर्मचारी, तर एक ऑफिस बॉय कामकाज पाहतात. त्यांना काम उरकत नाही. पौड हे तालुक्याचे गाव आहे. तहसील कार्यालय, पंचायत समिती, न्यायालय, पोलिस ठाणे, सबरजिस्ट्रार कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय अशी अनेक कार्यालये आहेत. येथूनच पुणे-कोलाड राष्ट्रीय महामार्ग जात आहे. इथे मोठमोठ्या निवासी संकुलांच्या इमारती उभ्या राहिल्या आहेत.

दुर्गम भागात सेवा देत असल्याचा आविर्भाव

पौड गावात आयडीबीआयकडून बँकिंग सेवा देताना कर्मचार्‍यांमध्ये दुर्गम भागात सेवा देत असल्याचा आविर्भाव दिसत आहे. पौड म्हणजे खूप दुर्गम. इथे सेवा देताना खूप अडचणी येतात, तरीही आम्ही काम करत आहोत. म्हणजे परग्रहावर काम करता का, असे विचारले, तर परग्रहावर काम केल्यासारखेच आम्ही करत आहोत, असे या बँकेतील कर्मचारी बोलून दाखवतात.

ग्राहकांना मारावे लागतात हेलपाटे

बँकेतील पासबुक प्रिंटिंग मशिन वारंवार बंद असते.कर्मचारीही ’नंतर या’, असे सांगत वेळ मारून नेतात. विनाकारण ग्राहकांना बँकेत फेर्‍या माराव्या लागतात. सर्वच ग्राहक ई-मेल, स्मार्टफोनमधील अ‍ॅप वापरू शकत नाहीत. परंतु, स्टेटमेंट ई-मेलवर मागवा, मोबाईलमधील अ‍ॅप वापरा, असे कोरडे सल्ले कर्मचार्‍यांकडून दिले जातात.

अनेक ग्राहकांनी बंद केली खाती

बँकेतील सुमार सेवेमुळे अनेक ग्राहकांनी आपली खाती इतर बँकांकडे वळवली. कित्येकांनी खाती बंद केली. कर्मचार्‍यांना किंवा बँकेला ग्राहकांची गरज नसल्याचे ग्राहकांना मिळणार्‍या वाईट अनुभवावरून लक्षात येते. तक्रारींसाठी संपर्क क्रमांक विचारला असता, इंटरनेटवरून मिळवा व तक्रार करा, असे सांगण्यात येते.

पौड शाखेत अवघे दोन कर्मचारी व एक ऑफिस बॉय आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांवर ताण येतो. प्रिंटिंग मशिनचे काट्रेज दिल्लीहून मागवावे लागते. उपलब्ध कर्मचार्‍यांतून सर्व सेवा द्याव्या लागतात. इथे अधिक कर्मचार्‍यांची गरज आहे.

- विवेक येवले, शाखा व्यवस्थापक, आयडीबीआय बँक, पौड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news