टाकळी भीमा येथील रांजणखळग्यांची दुरवस्था

ग्रामस्थांकडून संवर्धनाची मागणी
ranjankhalage
रांजणखळगे Pudhari
Published on
Updated on

शिरूर तालुक्यातील श्री क्षेत्र टाकळी भीमा येथील नैसर्गिक देणं लाभलेल्या भीमा नदीपात्रातील रांजणखळग्यांकडे प्रशासनासह ग्रामपंचायतीचेदेखील दुर्लक्ष झाले आहे. सध्या हे आकर्षक रांजणखळगे भग्नावस्थेत पडले असून, त्यांचे अस्तित्व लोप पावण्याच्या मार्गावर आहे. त्यांचे संवर्धन करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांसह पर्यावरणप्रेमींकडून होत आहे.

भीमा नदीपात्रात असलेले हे टाकळी भीमा येथील रांजणखळगे पर्यटनस्थळ असून, सोबतच येथे श्रीराम मंदिर असून त्याला तीर्थक्षेत्राचा ‘क’ दर्जा मिळालेला आहे. याच ठिकाणी असणारे कुंड मावलाई देवस्थान गावातील लोकांचे श्रद्धास्थान असून, आषाढ महिन्यात मोठ्या प्रमाणात महिला, भाविक या मावलाईच्या दर्शनासाठी येतात.

याशिवाय दरवर्षी पर्यटकांसह पर्यावरणप्रेमी, अभ्यासक आवर्जून येथे भेट देतात. काळ्या पाषाणावर (खडक) पांढर्‍या रंगाचे मिठाचे क्षार, विविध प्रकारचे शंख, शिंपले, त्यावरील बारीक तांबडी रेती, छोटे धबधबे यामुळे हे रांजणखळगे प्रेक्षणीय असून, येथील वातावरणही निसर्गरम्य आहे.

या रांजणखळग्यांमधील पाणी हे खारे असून, बाहेरील पाणी गोड लागते. त्यातील पाणीसाठा बाराही महिने दीर्घकाळ टिकतो, त्यामुळे परिसरातील शेतकर्‍यांना वर्षभर मुबलक पाणी उपलब्ध होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून या स्थळांकडे प्रशासनासह ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

रांजणखळग्यांत कचरा साचू लागला आहे. ते माती, दगडाच्या राड्यारोड्याने बुजू लागले आहे. झाडेझुडपे वाढू लागली आहेत. नदीपात्रात जाण्यासाठी चांगला रस्ता राहिलेला नाही. येथे येणार्‍या पर्यटकांसाठी सोयीसुविधा नाहीत, अशी एकंदरीत परिस्थिती झाली आहे.

याकडे प्रशासनासह ग्रामपंचायतीने वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे; अन्यथा रांजणखळग्यांना बकाल अवस्था प्राप्त होऊ शकते. तातडीने तेथे साफसफाई करून रांजणखळग्यांना पुनर्जीवन द्यावे, त्यांचे संवर्धन करावे, पर्यटकांसाठी आवश्यक त्या सुविधा देत पर्यटनाला चालना द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. दरम्यान, टाकळी भीमा गावाला पर्यटनस्थळाचा दर्जा मिळावा, अशी मागणी उपसरपंच सविता घोलप, माजी उपसरपंच अश्विनी पाटोळे यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news