पुणे : वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा दिलीप खेडकर हिने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा विभागाचीच (यूपीएससी) फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. नऊ वेळा परीक्षा देण्याची मुभा असतानाही तिने तब्बल बारा वेळा परीक्षा दिल्याची धक्कादायक माहिती केंद्र सरकारच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने (डीओपीटी) पाठविलेल्या नोटिशीत उघडकीस आली. त्याशिवाय परीक्षेसाठी त्यांनी इतर मागासवर्गासह (ओबीसी) बहुविकलांग प्रवर्गातून परीक्षा अर्ज भरला असून, वेळोवेळी आई-वडिलांच्या नावातही बदल केला असल्याचे देखील स्पष्ट झाले आहे.
पूजा खेडकर 2012 पासून परीक्षा देत होती. 2012 ते 2015 पर्यंत तिने ‘पूजा दिलीपराव खेडकर’ या नावाने परीक्षा दिली. त्या वेळी वडिलांचे नाव ‘दिलीप कोंडिबा खेडकर’, तर आईचा उल्लेख ‘मनोरमा दिलीपराव खेडकर’ असा केला. 2016 पासून वडिलांचे नाव कायम ठेवून 2018 पर्यंत आईचे नाव ‘मनोरमा जगन्नाथ बुधवंत’ असे लिहिले. तर 2019 मध्ये आईचे नाव ‘मनोरमा जे. बुधवंत’ असे, तर वडिलांचे नाव ‘खेडकर दिलीपराव के.’ असे लिहिले. 2023 पर्यंत दिलेल्या विविध परीक्षांमध्ये आई-वडिलांच्या नावांमध्ये बदल केले.
2021 ते 2023 या दरम्यान दिलेल्या परीक्षांमध्ये ‘पूजा मनोरमा दिलीपराव खेडकर’असे नाव वापरले असल्याचेदेखील स्पष्ट झाले. यूपीएससीची परीक्षा देण्यासाठी विविध प्रवर्गांसाठी किती वेळा परीक्षा देता येऊ शकते याच्या अटी आहेत. खेडकर हिची 2022 मधील आयएएस म्हणून बहुविकलांग या प्रवर्गातील ‘पर्सन वुइथ बेंचमार्क डिसअबिलिटीज’ (पीडब्ल्यूबीडी) या विशेष उपवर्गातून निवड झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.