Pune Politics: राजकारण्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा तमाशा करून ठेवला आहे. कोण कोणत्या पक्षात जातोय, कोण कोणाला विकला जातोय, हे समजत नाही. महाराष्ट्राची आयपीएल झाली आहे. कोण कोणत्या संघात आहे, कोणाबद्दल टाळ्या वाजवायच्या हेच कळत नाही, अशा शेलक्या शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सध्याच्या परिस्थितीवर टिपण्णी केली.
पुण्यात मनसे उमेदवारांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांनी सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक तसेच हडपसरमध्ये सभा घेतली. ‘आजवर अनेक जण मला सोडून गेले, पण रमेश वांजळे हयात असता तर कायम माझ्याबरोबर राहिला असता. मनसेला मतदान कराच; मात्र, रमेश वांजळेसाठी नक्की करा,’ असे आवाहन त्यांनी केले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हडपसर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार साईनाथ बाबर यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. या वेळी पक्षाचे अनिल शिदोरे, नेते राजेंद्र वागस्कर, सरचिटणीस बाळासाहेब शेडगे, अजय शिंदे, माजी नगरसेविका आरती बाबर, महिला शहराध्यक्षा वनिता वागस्कर, योगगुरू दीपक शिळीमकर, कीर्तनकार प्रियंका भोसले, पक्षाचे प्रवक्ते योगेश खैरे यांसह मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले, राजकारण्यांनी विकासाच्या नावाखाली पुण्याचा सत्यानाश करून ठेवला आहे. शहरातले काही भाग पाहिले की मरण येत नाही म्हणून लोक जिवंत आहेत, असे वाटते. पण लोक याबद्दल काही बोलत नाहीत आणि राजकारण्यांना तेच हवे असते.
आपल्याला काय हवे ते तुम्हाला माहीत नाही आणि काय द्यायचे हे राजकारण्यांना कळत नाही. जगभरातील शहरांमध्ये रस्ते, पायाभूत सुविधा झपाट्याने सुधारत आहेत. आपल्याकडे गेल्या 25 वर्षांपासून मूलभूत प्रश्नांवर निवडणुका लढवल्या जात आहेत. नागरिक चिडत नाहीत, प्रश्न विचारत नाहीत म्हणून राजकारण्यांचे फावते आहे.
समाजाला जातीजातीत विभागणे, द्वेष निर्माण करणे हेच काम राजकारण्यांनी केले आहे. केवळ सामान्य नागरिक नव्हे; तर त्यांनी महापुरुषही जातीत विभागले. जातीपातीच्या राजकारणामुळे महाराष्ट्राची पातळी खालावली आहे. पूर्वी एकत्र सण साजरे केले जात, एकत्र जेवायचे. आता मुलेही इतर जातीतील मुलांबरोबर खेळत नाहीत. आपल्याला असा महाराष्ट्र हवा आहे का?, असा सवाल त्यानी उपस्थित केला.
मुख्यमंत्रिपदाचा सोस नाही
मला मुख्यमंत्रिपदाचा सोस नाही. शिवराय, मराठेशाहीचे गतवैभव महाराष्ट्रात पुन्हा आणायचे आहे. तरुणांनी महाराष्ट्राकडे लक्ष दिले पाहिजे, असेही राज ठाकरे यांनी या वेळी सांगितले.
शरद पवारांनी द्वेषाचे राजकारण केले
राष्ट्रवादी काँग्रेसचा 1999 मध्ये जन्म झाल्यापासून जातीपातीचे राजकारण सुरू झाले. शरद पवार यांनी द्वेषाचे राजकारण सुरू केले. देशाला दिशा देणार्या आपल्या महाराष्ट्राची अशी दशा झाली. मूळ विषयांकडे लक्ष कोण देणार? आम्ही रस्ते, फुटपाथच्या कामाची टेंडर काढू, निकृष्ट काम करू, आमचे खिसे भरू; तुम्ही जातीपातीमध्ये भांडत राहा, असा राजकारण्यांचा अजेंडा आहे, असेही ठाकरे म्हणाले.
हडपसरमध्ये अनेक प्रश्न : बाबर
साईनाथ बाबर म्हणाले की, महायुतीचे उमेदवार हिंदुत्वावर एकही शब्द बोलत नाहीत. छत्रपतींचा अवमान झाला तर हे आमदार घरात बसतात. जन्मतः या आमदाराने सोन्याचा चमचा घेऊन आलेला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न कळणार नाहीत. कचरा प्रश्न, पाण्याबरोबरच वाहतूक कोंडी असे अनेक प्रश्न आहेत.
मला खुर्चीचा सोस नाही. महाराष्ट्राचा विकास हे माझे स्वप्न आहे. राज्याचे गतवैभव मला परत आणायचे आहे. तुम्हाला चिखलातून बाहेर काढायचे आहे. मूलभूत प्रश्न भिजत घोंगडे न ठेवता मार्गी लावायचे आहेत. मनसेच्या जाहीरनाम्यामध्ये केवळ आश्वासने नसतील, तर प्रश्नांची उत्तरे असतील.
राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे