दीपक देशमुख
आगामी विधानसभा निवडणुकीत दौंड विधानसभेत दुरंगी म्हणजे पारंपरिक प्रतिस्पर्धी आमदार राहुल कुल आणि जिल्हा बँकेचे संचालक रमेश थोरात यांच्यात लढत रंगणार की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट नवीन उमेदवार देऊन पारंपरिक लढत तिरंगी करणार, हे पाहावं लागणार आहे.विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच दौंड तालुक्यात जोरदार राजकीय धुरळा उडाला आहे. भाजपचे विद्यमान आमदार राहुल कुल हे महायुतीचे उमेदवार असतील, हे जवळपास नक्की असले, तरी महायुतीकडून भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे देखील इच्छुक आहेत. दुसरीकडे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी आमदार रमेश थोरात हे निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे पाहायला मिळत आहे.
रमेश थोरात हे अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. रमेश थोरात यांना विधानसभा निवडणूक लढवायची झाल्यास त्यांच्यापुढे अपक्ष किंवा शरद पवार गट, असा पर्याय आहे. थोरात यांचे समर्थक तुतारीकडून उमेदवारी घ्या, असा आग्रह रमेश थोरात यांना करीत आहेत. रमेश थोरात याबाबत काय भूमिका घेतात, याची उत्सुकता आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांना दौंड विधानसभेतून मिळालेली 25,000 मतांची आघाडी पाहता शरद पवार नेमकी काय भूमिका घेतात, हे पाहावे लागणार आहे.
अजित पवार यांनी शरद पवार यांच्याशी फारकत घेतल्यानंतर दौंड तालुक्यातून रमेश थोरात यांनी अजित पवार यांच्याबरोबर जाणे पसंत केले होते. शरद पवार यांचे निष्ठावान म्हणून शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार हे लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्याबरोबर ठामपणे राहिले. निष्ठावंत म्हणून त्यामुळे आप्पासाहेब पवार यांना उमेदवारी मिळावी, यासाठी ते प्रयत्नशील आहेत. आप्पासाहेब पवार यांच्याबरोबर आणखी काही इच्छुक शरद पवार गटात असले, तरी त्यांचे आव्हान फार मोठे नसणार आहे. परंतु, अंतिम उमेदवारी कोणाला द्यायची, याचा निर्णय मात्र स्वतः शरद पवार हेच घेतील, असे सांगितले जात आहे.
लोकसभा निवडणुकीत आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात यांनी एकत्रितपणे प्रचार करून देखील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना 25 हजार मतांची पिछाडी पाहावी लागली होती. त्यामुळे शरद पवार हे रमेश थोरात यांना पक्षात घेण्यास इच्छुक असतील का नाही, ते आता सांगणे कठीण असले, तरीही महायुतीच्या उमेदवाराला आव्हान देणारा उमेदवार म्हणून रमेश थोरात यांच्याकडेच पाहिले जात आहे.
रमेश थोरात यांनी जर शरद पवार गटात प्रवेश करून उमेदवारी मिळवली, तर आमदार राहुल कुल आणि रमेश थोरात यांच्यात समोरासमोर थेट लढत होईल. मात्र, शरद पवार यांनी जर नवीन उमेदवार मैदानात आणला, तर मात्र तालुक्यात तिरंगी लढत पाहायला मिळेल. रमेश थोरात यांनी जर अजित पवारांची साथ सोडली, तरीही तालुक्यात ’महानंदा’च्या माजी अध्यक्षा वैशाली नागवडे, माजी जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे, नानगावचे उपसरपंच संदीप खळदकर व इतर मंडळी मात्र अजित पवार यांच्याबरोबर ठामपणे राहतील, असे चित्र आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात यांच्यात झालेल्या चुरशीच्या लढतीत राहुल कुल यांना निसटता विजय मिळाला होता. त्यामुळे या वेळी रमेश थोरात समर्थक जोरदार तयारी करताना दिसत आहेत, तर दुसरीकडे सलग 10 वर्षे सत्ता हातात असल्याने विकासकामांच्या जोरावर आमदार राहुल कुल यांचा संपूर्ण मतदारसंघात जनसंपर्क कायम आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार अनेकदा आपल्या जाहीर कार्यक्रमात आपण जिल्हा बँकेच्या माध्यमातून राजकारणात आलो आणि माजी आमदार रमेश थोरात यांनी आपल्याला प्रथम राजकारणात आणले, असे सांगत असतात. आजपर्यंत अजित पवारांनी रमेश थोरात यांना कायमच राजकीय दृष्टीने झुकते माप दिले आहे. परंतु, आता रमेश थोरात यांना विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरावे लागणार आहे. त्यांच्यापुढे अपक्ष किंवा शरद पवार गट, हे पर्याय असतील. परिणामी, थोरात यांना अजित पवारांची साथ सोडावी लागणार आहे, त्यामुळे या वेळी गुरू शिष्याला सोडून जाणार, हे चित्र पाहायला मिळू शकते.