

खोर: दौंड तालुक्यात गट-गणांच्या वाढलेल्या संख्येमुळे स्थानिक राजकारणाचे समीकरण मोठ्या प्रमाणावर बदलणार आहे. मागील निवडणुकीत तालुक्यात 12 गण व 6 गट होते. मात्र, या वेळी ही संख्या वाढवून 14 गण व 7 गट करण्यात आले आहेत. ही वाढलेली संख्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर थेट प्रभाव टाकणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
अजूनतरी गण-गटांच्या रचनेत कसे बदल होतील, हे सध्यातरी स्पष्ट करण्यात आले नसले तरी या फेररचनेमुळे स्थानिक नेत्यांची गणिते पूर्णतः बदलणार आहेत. अनेक भागांमध्ये नव्याने गण तयार झाल्यामुळे जुन्या राजकीय गोटांमध्ये मतविभाजन होण्याची शक्यता आहे. (Latest Pune News)
अनेक गावे ही आधी ज्या गटात होती तिथून ती वेगळी होऊ शकतात, त्यामुळे त्या भागातील जुन्या नेतृत्वाला नवीन मतदारसंघात पुन्हा प्रभाव निर्माण करावा लागेल. याशिवाय काही गटांचे क्षेत्रफळ कमी-जास्त झाल्यामुळे मतदानाचा आकडा व सामाजिक रचना बदलणार आहे.
एखाद्या समाजघटकाचा प्रभाव पूर्वीपेक्षा वाढेल किंवा कमी होईल आणि त्यामुळे उमेदवार निवडीतसुद्धा बदल घडू शकतो. नवीन गटांमुळे नव्या चेहर्यांना संधी मिळेल, ज्यामुळे जुन्या नेत्यांपुढे आव्हान निर्माण होणार आहे.
या फेररचनेचा सर्वांत मोठा परिणाम म्हणजे मतांची नव्याने मांडणी आणि त्यातून निर्माण होणारे नवे आघाडी-संघर्षाचे चित्र असेल. आगामी निवडणुकांमध्ये यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. कोणता पक्ष किंवा गट या बदलाचा अधिक लाभ घेणार, हे येणारा काळच ठरवेल.
राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समतोल राखण्यासाठी व लोकसंख्येच्या आधारावर गट व गणांची फेररचना केली आहे. यामुळे काही भागांचे सीमांकन नव्याने करण्यात आले असून, काही प्रभागांचे विलीनीकरण किंवा विभाजनही झाले आहे.
नवीन फेररचनेनुसार गट
व गणांचे विहंगावलोकन
प मागील रचना : 12 गण, 6 गट
प सध्याची रचना : 14 गण, 7 गट
प मागील वेळेस दौंड तालुक्यात राहू-खामगाव, पारगाव-केडगाव, बोरीपार्धी-कानगाव, लिंगाळी-मलठण, खडकी-पाटस, भांडगाव-यवत असे 6 गट होते. तर राहू, खामगाव, पारगाव, केडगाव, बोरीपार्धी, कानगाव, लिंगाळी, मलठण, खडकी, पाटस, भांडगाव आणि यवत असे 12 गण होते.