Indapur News: आमच्या नेत्याची अस्तित्वाची लढाई आहे, आमच्या नेत्याने लय भोगलंय... अन्याय झालाय... तर दुसरा म्हणतोय आमच्या नेत्याने लय कामं केली, लय विकास निधी आणला, तर तिसरा म्हणतोय आमचा युवा आणि स्वच्छ चेहरा हाय, कोरी पाटी आहे. आमचाच नेता लय पावरफुल्ल हाय... यांच्या नेत्यांनी आमची घरं फोडली... यांचा आता कायमचा बंदोबस्त होणार... गुलाल आम्हीच उधळणार... या आणि अशा अनेक वल्गना ठासून सांगण्यामध्ये इंदापूर तालुक्यात आता रंगत आली आहे.
आमचाच नेता इंदापूरचा आमदार होणार, असे तीनही नेत्यांच्या जवळचे कार्यकर्ते म्हणत आहेत. मात्र, यातील ऐकणारामध्ये दोन जणांचे कार्यकर्ते ऐन थंडीत त्यांना घाम फुटत असून, त्यांना झोप लागेनाशी झालीय. आपला नेता जर पराभूत झाला, तर अनेक जण राजकारणातून कायमची निवृत्ती घेणार, असेही बोलत आहेत अशी स्थिती इंदापूर तालुक्यात सध्या दिसून येत आहे. काही हॉटेल्स, कट्टे, टपर्या आणि पारापारावर अमुक नेता येणार, आमचाच नेता येणार, लाव किती ताकद लावायची ते अशा पैजांची सरबत्तीही रंगू लागल्या आहेत.
इंदापूर तालुक्यात लोकसभेच्या निवडणुकीअगोदर राजकीय समीकरणे वेगाने बदलली. अनेक नेत्यांनी काही नेत्यांना व पक्षांना सोडून दुसर्या पक्षात प्रवेश करीत आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला. जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करीत खासदार सुप्रिया सुळे यांचा प्रचार केला आणि ते विधानसभेचे प्रमुख दावेदार झाले.
यामध्ये जिल्हा परिषदेचे माजी सभापती परिवर्तन विकास आघाडीचे विधानसभेचे उमेदवार राहिलेले प्रवीण माने यांनीही दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहून अंदाज घेतला. विधानसभेला उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्नशील असलेले माने व जगदाळे यांना भाजपचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अचानक शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्याने विधानसभेची उमेदवारी मिळण्याचे चिन्ह धूसर वाटू लागल्याने त्यांनी पक्षाकडे प्रयत्न केले.
पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गोविंदबागेत सर्वांना आश्वासित केले. मात्र, भाजपच्या हर्षवर्धन पाटील यांचा पक्ष प्रवेश करून थेट त्यांना विधानसभेत पाठवा, असेच सांगितल्याने त्या आशा मावळल्या. पुढे जगदाळे यांनी अजित पवार गटात प्रवेश केला, तर प्रवीण माने यांनी बंडखोरी करून ’अभी नही तो कभी नही’ असे म्हणत परिवर्तन विकास आघाडीतून थेट निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला.
शहरामध्ये मोठे प्रस्थ असलेले शहा कुटुंबानेही हर्षवर्धन पाटलांना सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केला होता. मात्र, ते र्षवर्धन पाटील यांना पक्षात घेतल्याने नाराज दिसून आले. त्यांची समजूत काढण्यात स्वतः शरद पवार त्यांच्या घरी आले. मात्र, त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत आपली भूमिका जाहीर केली नाही. अजित पवार पक्षाकडून विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे, तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून हर्षवर्धन पाटील, परिवर्तन विकास आघाडीतून प्रवीण माने अशी तिरंगी लढत इंदापुरात झाली.
मतदान प्रक्रिया पार पडली. अनेक ठिकाणी लक्ष्मीदर्शनही झाले. आता तीनही उमेदवारांचे कार्यकर्ते आमचाच नेता निवडून येणार, यावर पैजा लावत आहेत. मात्र, प्रत्यक्षात इंदापूर तालुक्यातील मतदारराजांनी कोणाच्या पारड्यात आपले बहुमोल मत दिले आहे, हे येत्या शनिवारी 23 तारखेलाच.