एका दारुड्याने पोलिस नियंत्रण कक्षाला केलेल्या फेक कॉलमुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. दारूच्या नशेत नियंत्रण कक्षाच्या 100 नंबरवर कॉल करून त्याने 30 ते 40 लोक तलवार घेऊन रस्त्यावरून फिरत असल्याचे सांगितले. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कॉलची पडताळणी केली असता, हा खोटा फोन असल्याचे समोर आले. फरासखाना पोलिसांनी याप्रकरणी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
रोहित मुकेश चव्हाण (वय 20) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस कर्मचारी विवेक पाटील यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चव्हाण हा कामधंदा करीत नाही. तो बुधवारी रात्री दहाच्या सुमास मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालयसमोर उभा होता. त्या वेळी त्याने दारू प्यायलेली होती. दारूच्या नशेत असतानाच त्याने पोलिसांच्या नियंत्रण कक्षात (कंट्रोल रूम) फोन केला.
मला पोलिस मदत हवी आहे. 30 ते 40 जण तलवार घेऊन मंगळवार पेठेत फिरत असून, माझ्या जिवाला धोका आहे, अशी माहिती नियंत्रण कक्षाला दिली. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस नियंत्रण कक्षाने त्वरित फरासखाना पोलिसांना या घटनेची माहिती दिली. फरासखाना पोलिस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचार्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. कमला नेहरू रुग्णालय परिसरात त्यांनी चौकशीला सुरुवात केली. त्या वेळी असा कोणताही प्रकार घडलेला नसल्याचे समोर आले. पोलिसांनी आरोपीच्या मोबाईल क्रमांकाचा शोध घेतला. पोलिसांची दिशाभूल करून खोटी माहिती दिल्याप्रकरणी चव्हाणविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.