

वेल्हे: राजगड तालुक्यातील तोरणागडाच्या पायथ्याला खरीव गावात बंदुकीने गोळीबार करून दहशत निर्माण करणार्या पोलीस पाटलाविरोधात वेल्हे पोलिसांनी गुरुवारी (दि. 13) सायंकाळी पावणेसहा वाजता भारतीय विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला.
गणेश शिंदे (वय 44) असे या पोलीस पाटलाचे नाव आहे. या प्रकरणी वेल्हे पोलीस ठाण्याचे अंमलदार ज्ञानदीप धिवार यांनी फिर्याद दाखल केली. याबाबत धिवार यांनी सांगितले की, हा प्रकार गुरुवारी सकाळी नऊपूर्वी घडला.
खरीव गावातील सार्वजनिक ठिकाणी पोलीस पाटील गणेश शिंदे याने आपल्या परवाना असलेल्या बंदुकीने हवेत गोळीबार करून दहशत निर्माण केली. बंदुकीचा वापर स्व:संरक्षणासाठी न करता समाजात दहशत निर्माण करण्यासाठी शिंदे याने हवेत गोळीबार केला.
त्यामुळे इतरांची सुरक्षिता धोक्यात येईल, असे निष्काळजीपणाचे कृत्य त्याने केले आहे संबंधित पोलीस पाटील हवेत गोळीबार करत असल्याचे वृत्त सकाळी एका सोशल माध्यमात प्रसारित झाले होते. त्यामुळे पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले.
वरिष्ठ अधिकार्यांच्या आदेशानुसार वेल्हे पोलिसांनी याची दखल घेत तातडीने पोलिस पाटलाविरोधात स्वतः फिर्याद दाखल करत गुन्हा दाखल केला. वेल्हे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नितीन खामगंळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार बी. ए. मांडके या घटनेचा तपास करीत आहेत.