रुग्णांच्या जिवाशी खेळ! रक्तगटाची अदलाबदल झाल्याने त्रास; आयसीयूमध्ये भरती

रुग्णांच्या जिवाशी खेळ! रक्तगटाची अदलाबदल झाल्याने त्रास; आयसीयूमध्ये भरती

पुणे : पुढारी वृत्तसेवा : न्यूमोनिया झाल्याने एक रुग्ण रुग्णालयात दाखल झाला. त्याला रक्त देण्याची गरज भासली. नेमका त्याचवेळी मोठा हलगर्जीपणा झाला. सोबतच्या आणखी एका रुग्णाला रक्ताची गरज होती. दोन्ही रुग्णांचा रक्तगट वेगवेगळा. मात्र, रुग्णांना त्यांच्या नावे आलेली रक्तपिशवी देण्याऐवजी अदलाबदली झाली. या दोन्ही रुग्णांना त्रास झाल्याने अतिदक्षता विभागात उपचारासाठी ठेवण्यात आले. हा धक्कादायक प्रकार घडला आहे, औंध जिल्हा रुग्णालयात.

औंध येथील एका रुग्णाला 21 मार्च रोजी दुपारी औंध जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला न्यूमोनिया झाल्याने श्वास घेण्यास अडचण येत होती. सूजही आली होती. त्याला डॉक्टरांनी दोन-तीन दिवस अ‍ॅडमिट करण्याचा सल्ला दिला. रुग्णालयात दोन-तीन दिवस उपचार सुरू असतानाच शनिवारी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याची रक्ततपासणी केली. त्याला रक्त देण्याची सूचना तेथील परिचारिकेला दिली. त्याच वेळी शेजारीच आणखी एक रुग्णालादेखील रक्त द्यायचे होते. एका रुग्णाचा रक्तगट ए पॉझिटिव्ह, तर दुसर्‍याचा रक्तगट बी पॉझिटिव्ह होता.

दोन्ही रुग्णांच्या नावाने रक्ताच्या पिशव्या आल्या. मात्र, संबंधित परिचारिकेने निष्काळजीपणा केला. ए पॉझिटिव्ह रक्तगट असलेल्या रुग्णाची पिशवी बी पॉझिटिव्ह रुग्णाला, तर बी पॉझिटिव्ह रुग्णाची रक्तपिशवी ए पॉझिटिव्ह रक्तगट असलेल्या रुग्णाला देण्यात आली. रुग्णाला त्रास सुरू झाल्याने नातेवाइकांनी तक्रार केल्यावर त्या रक्तपिशव्या काढण्यात आल्या. दोन्ही रुग्णांना तत्काळ आयसीयू कक्षात उपचारासाठी शिफ्ट करण्यात आले. आता दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले यांनी सांगितले.

रक्त आल्यानंतर ते बरोबर आहे का, हे तपासून चढवण्याची सूचना डॉक्टर देतात. ते रक्त चढवण्याची जबाबदारी परिचारिकांवर असते. रुग्णालयात दोन्ही रुग्णांना परिचारिकेच्या निष्काळजीपणामुळे रक्त चुकीचे लावले गेले. त्यामुळे संबंधित परिचारिकेला सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. तसेच, याबाबत चौकशी करण्यात येत आहे.

– डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय

या प्रकरणाचा चौकशी अहवाल मागवला आहे. चौकशी अहवाल आल्यावर संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल.

– डॉ. राधाकिशन पवार, आरोग्य उपसंचालक, पुणे परिमंडळ

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news