भामा आसखेड: महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त असलेल्या कृषी बियाणे विक्रेत्या दुकानदाराने दिलेले इंद्रायणी वाणाचे भात बियाणे भेसळयुक्त निघाल्याने शेतकर्याच्या शेतात भातपीक उगवण्याऐवजी 80 टक्के कुसळीचे गवत उगवल्याचा प्रकार खेड तालुक्यातील शिवे येथे उघडकीस आला.
यामध्ये शेतकर्याची फसवणूक झाली असून मोठे नुकसान झाले आहे. भेसळयुक्त बियाणे असल्याचा अहवाल तक्रार निवारण समिती व बियाणे निरीक्षक तथा उपविभागीय कृषी अधिकारी यांनी दिला आहे. त्यामुळे दुकानदारावर कारवाई करावी करून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकर्याने केली आहे.
दत्तू ममता शिवेकर असे फसवणूक झालेल्या भात उत्पादक शेतकर्याचे नाव आहे. दत्तू शिवेकर यांनी कर्नाटक अॅग्रो सिड्स कंपनीचे इंद्रायणी भात वाणाचे 75 किलो बियाणे (एक बॅग 25 किलो प्रमाणे 3 बॅग) मावळ तालुक्यातील इंदोरी येथील इंद्रायणी कृषी सेवा केंद्रातून 30 मे रोजी खरेदी केले. त्यानंतर बियाणे शेतात टाकून रोपे एक महिन्याची झाली. 15 जून 2024 रोजी 60 मजुरांच्या साहाय्याने भात रोपांची 2 एकर क्षेत्रात लागवड केली.
भात पिकाला आवश्यक तेवढा पाऊसदेखील चांगल्या प्रमाणात झाला. उत्पादन अधिक मिळावे या हेतूने शेतकर्याने चांगली मेहनत घेतली. पिकाची वाढ झाल्यानंतर भात पीक निसवणीस आले असता भाताचे ओंब्यांना एक-दोन तर काही ठिकाणी तीन-चार दाणे आले. भाताऐवजी कुसळी गवताचे प्रमाणच जास्त दिसत होते. त्यामुळे बियाणे बोगस असल्याचे शेतकर्याच्या निदर्शनास आले.
बियाणे खरेदी केलेल्या दुकानदाराला दत्तू शिवेकर यांनी शेतातील पिकाची परिस्थिती सांगितली असता दुकानदाराने अंग झटकून ज्या डीलरकडून विक्रीसाठी बियाणे घेतले त्याचा मोबाईल क्रमांक दिला. डीलरला फोन केला असता असे कसे होईल म्हणून भेसळयुक्त बियाणांची जबाबदारी झटकली. त्यामुळे शिवेकर यांनी खेड कृषी विभागाकडे तक्रार केली.
त्यानुसार बियाणे निरीक्षक खेड विभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी सतीश शिरसाठ, तालुका कृषी अधिकारी नंदकुमार वाणी, पंचायत समिती कृषी अधिकारी एस. जी. पवार व विषयतज्ज्ञ म्हणून कृषी विकास केंद्र नारायणगाव दत्तात्रय गावडे यांच्या संयुक्त समितीने शिवेकरांच्या भातपिकाची पाहणी केली. या वेळी बियाणे भेसळयुक्त असून शेतात कुसळी गवत उगवल्याचा निष्कर्ष अहवाल समितीने दिला आहे. त्यामुळे शिवेकर हे आता कायदेशीर मार्गाने तक्रार दाखल करणार आहेत.
बियाणे विक्रेत्या दुकानदाराने डीलरचा मोबाईल क्रमांक देत कंपनी व तुम्ही बघून घ्या, असे सांगितले. तर डीलरने इतरांचे बियाणे खराब नाही; तुम्ही आरोप करत आहात, असे सांगितले. माझे अंदाजे दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. कंपनीने नुकसानभरपाई दिली पाहिजे. दुकानदार, डीलर हे माझा व कृषी अधिकार्यांशी संपर्क साधायला तयार नाहीत. त्यासाठीची कायदेशीर तक्रार व लढाई लढणार आहे.
दत्तू शिवेकर, नुकसानग्रस्त भात उत्पादक शेतकरी, शिवे