पिंपरी : चिंचवड येथील : प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाचे भाडे, अनामत रक्कम व इतर शुल्कासाठी जमा झालेल्या रक्कमेतून तब्बल 7 लाख 66 हजार 236 रुपयांचा अपहार करण्यात आला आहे. त्यामुळे लिपिक संकेत जंगम याचे सेवानिलंबन करण्यात आले असून, विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.
प्रा. मोरे प्रेक्षागृहात वर्षभरात मोठ्या संख्येने विविध कार्यक्रम होतात. तसेच, व्यावसायिक नाटक, स्नेहसंमेलन, मेळावे, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम सतत होतात. त्यामुळे भाडे, अनामत रक्कम व इतर शुल्कातून या प्रेक्षागृहात मोठे उत्पन्न मिळते. या प्रेक्षागृहात क्रीडा विभागाचे संकेत जंगम हे लिपिक आहेत. ते प्रेक्षागृहाचे व्यवस्थापन सांभाळतात. त्यांनी भाड्यापोटी जमा झालेले चेक व डीडी त्यांनी बँकेत भरलेले नाहीत. त्यामुळे काही डीडीची मुदत संपली आहे.
भाडे व अनामत रक्कम जमा करून तशी रजिस्टरमध्ये नोंद आहे. मात्र, प्रत्यक्षात काहीचेच भाडे जमा केले आहे. एका पावती पुस्तकातील 140 पैकी केवळ 35 कार्यक्रमांच्या पावत्यांचा भरणा केला आहे. दुसर्या पावती पुस्तकातील 140 पैकी केवळ 6 कार्यक्रमांच्या पावत्यांच्या भरणा केला आहे. तर, तिसर्या पावती पुस्तकातील 140 पैकी केवळ 21 कार्यक्रमांच्या पावत्यांची रक्कम जमा आहे.
तब्बल 4 लाख 3 हजार 697 इतकी रक्कम न भरता स्वत: जवळ ठेवली. तर, लेखापरिक्षणानुसार एकूण 7 लाख 66 हजार 236 इतकी रक्कम वसुलपात्र असल्याचे आढळून आले आहे. आर्थिक अपहार करून महापालिकेचे आर्थिक नुकसान व फसवणूक केल्याने लिपिक जंगम याचे आयुक्त शेखर सिंह यांनी निलंबन केले आहे. त्याची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.
हेही वाचा