

पिंपरी : वर्षा कांबळे : या वर्षी पिंपरी चिंचवड शहरवासीयांना प्रचंड उकाड्याचा त्रास जाणवत आहे. पुणे आणि मुंबईच्या तुलनेत पिंपरी चिंचवड शहर सर्वाधिक उष्ण शहर ठरत आहे.
शहराचे तापमान हे पुणे आणि आसपासच्या शहरापेक्षा दररोज 1 ते 2 अंशानी वाढत आहे. शहराचे तापमान कधी नाही एवढे 40 ते 42 अंशापर्यंत पोहचले आहे.
कधी काळी पिंपरी चिंचवड शहर हे जैवविविधतेच्यादृष्टीने संपन्न शहर होते. मात्र, वाढते शहरीकरण, महाकाय वृक्षांची संख्या कमी, खालावलेली भूजल पातळी, सिमेंट रस्ते, जल आणि वायू प्रदूषण या सर्व कारणांमुळे तापमान वाढ होत आहे, असे पर्यावरण तज्ज्ञ व भूजल वैज्ञानिकांचे मत आहे.
शहरात असलेल्या महाकाय वृक्षांवरूनच शहरास पिंपरी चिंचवड हे नाव पडले आहे. पूर्वी शहरात रस्त्याच्या कडेने सर्व पिंपरी, चिंच, वड असे महाकाय वृक्ष पहायला मिळत होते.
मात्र, रस्ते रुंदीकरणामध्ये मोठ्या प्रमाणात या वृक्षांची छाटणी करण्यात आली. त्यांनतर वृक्ष लागवडीमध्ये परदेशी वृक्ष लावण्यात आले. भक्ती – शक्तीच्या पुढे देहुरोडकडे जातानाच दोन्ही बाजूला महाकाय वृक्ष दिसतात. पूर्वी शहरामध्ये देखील अशाप्रकारचे रस्त्याच्या दुतर्फा महाकाय वृक्ष होते.
महाकाय वृक्षांमध्ये पाणी साठविण्याची क्षमता जास्त असते. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढते. तसेच वातावरणात या वृक्षांमुळे ऑक्सिजनची पातळी वाढते. देहुरोड याठिकाणी छावणी परिसर असल्याने याठिकाणी झाडे अजूनही टिकून आहेत.
स्मार्ट सिटीच्यादृष्टीने महाकाय झाडे लावणे. घनवन व देवराई निर्माण करायला पाहिजे. पिंपरी, चिंच व वडांच्या झाडांची संख्या वाढविली पाहिजे. पाणी टंचाईचा देखील प्रश्न आहे, त्यावर मात करण्यासाठी जे ग्राऊंड वॉटर आहे. त्याची साठवण करण्यासाठी वॉर्डनिहाय तळी निर्माण केली पाहिजे. जेणेकरुन पाऊस पडल्यानंतर भूगर्भातील पाणी साठा वाढेल.
– अॅड. प्रभाकर तावरे,सेवानिवृत्त सहाय्यक आरोग्य अधिकारी
शहरात पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. यामध्ये पाण्याचा वापर, अनधिकृत नळजोड, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा प्रकल्प आणि रेन हार्वेस्टिंग याबाबत प्रशासन उदासीन दिसून येत आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारी लोकसंख्या, भूगर्भातील पाणी पातळीवर वेगाने अतिक्रमण करत आहे. शहरामध्ये नैसर्गिकरित्या पाणी जिरण्याच्या ज्या जागा आहेत. त्या जागा दिवसेंदिवस वाढत्या शहरीकरणामुळे कमी होत आहेत. याचा परिणाम शहरातील वातावरणावर होत आहे.
– उपेंद्र धोंडे,भूजल वैज्ञानिक, जलशक्ती मंत्रालय
https://youtu.be/wimwsVNgHnY