

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : थकीत वीज बिलासाठी वीज जोड अथवा वीज कनेक्शन तोडण्यापूर्वी पंधरा दिवसांनी लेखी सूचना देणे बंधनकारक असताना वीज वितरणकडून पूर्व सुचनेशिवाय वीजजोड अथवा कनेक्शन तोडण्याचे प्रकार घडत असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
वीज प्रकरणांबाबत देशभरात लागू झालेल्या विद्युत अधिनियम 2003 मधील कलम 56 नुसार थकीत बिलासाठी वीज कनेक्शन तोडण्यापूर्वी पंधरा दिवसांची लेखी पूर्व सूचना बंधनकारक करण्यात आली आहे.
हे कलम देशभरातील विद्युत पुरवठा कंपन्यांना लागू करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादितच्या वेबसाइटवर सुद्धा ग्राहकांचा अधिकार या भाग 6 मध्ये थकीत बिलासाठीही पंधरा दिवसांची लेखी पूर्वसूचना ही ग्राहकांचा अधिकार म्हणून जाहीर करण्यात आली आहे.
खासगी असो व शासकीय प्रत्येक वीजपुरवठादारास थकीत बिलाअभावी वीजजोड तोडण्यापूर्वी लेखी पूर्व सूचना अथवा नोटीस बंधनकारक करण्यात आली असून तो ग्राहकांचा महत्वाचा अधिकार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
विद्युत पुरवठा कायदा कलम 56 व 171 नुसार वीज तोडण्याची लेखी 15 दिवसांची नोटीस ग्राहकाला दिलीच पाहिजे. त्याची पोच पावतीसुद्धा मंडळाने घेतली पाहिजे.
या नियमाची माहिती नसल्याने किंवा त्या नियमाकडे दुर्लक्ष करत मंडळाचे कर्मचारी वीज तोडतात. मंडळाकडून मोबाईलवर थकबाकीबाबत एसएमएस पाठवला असल्याचे वीज वितरणकडून सांगण्यात येते. मात्र, अशा एसएमएसद्वारे पाठवलेल्या नोटीसीला विधी ग्राह्यता नसते. तरीही विजवितरण रेटून नेण्याचे काम करत आहे.
विशेषतः भोसरी विभागात कोणतीही पूर्वसूचना न देता वीज वितरणकडून थकीत विजबिलापोटी सामान्य ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडण्याचे प्रकार घडत आहेत. बड्या थकबाकीदारांना अभय का असा सवाल नागरिक करत आहेत.
प्राधिकरणातील त्रिमूर्ती हौसिंग सोसायटीमध्ये मी राहते. माझ्या वडिलांचे निधन झाल्याने आईने तीन महिन्यापूर्वी पुनर्विवाह केला. मी स्वतः प्राधिकरणातील एक महाविद्यालयात एम. बी. एचे शिक्षण घेत असल्याने माझ्या मूळ घरीच राहत आहे. तीन महिन्याचे वीजबिल 1380 रुपये थकल्याने वीज वीतरणच्या वायरमनने 21 मार्च रोजी अचानक वीज कनेक्शन तोडले.रात्री 11 वाजता आईने ऑनलाईन बील पे केले. त्यानंतर पुन्हा वीज कनेक्शन जोडण्यासाठी टोलवाटोलवी करण्यात येत होती माझ्या वडिलांनी अधिकार्यांकडे प्रचंड पाठपुरावा केल्यानंतर दुसर्या दिवशी दुपारनंतर कनेक्शन जोडून देण्यात आले.
– कु. प्रतीक्षा सावरकर, विद्यार्थीनी, प्राधिकरण, निगडी
वीज बिलाची रक्कम 1380 रुपये एवढी कमी असताना लाइनमनने सदर वीज ग्राहकाचे वीज कनेक्शन थेट कसे काय तोडले ? याबाबत मलाच आश्चर्य वाटले. या प्रकरणी माहिती घेऊन वीज बिल भरलयानंतर त्यांचे कनेक्शन पूर्ववत जोडून देण्यात आले.
-उदयकुमार भोसले, कार्यकारी अभियंता महावितरण भोसरी