

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण नियंत्रण व निर्मूलनासाठी बीट निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.
कारवाईत हातगाडी विक्रेत्यांकडून दोन हजार रुपये घेऊन स्वत:जवळील पावतीवर एक हजाराची नोंद केली. आर्थिक अपहार केल्याबद्दल दोन महिला बीट निरीक्षकांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत.
स्थापत्य अभियांत्रिकी सहायक प्रियंका शिंदे आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहायक दिपाली जगदाळे हे त्या बीट निरीक्षकांची नावे आहेत. पालिकेतर्फे क्षेत्रीय कार्यालयनिहाय धडक कारवाई पथके तयार करण्यात आली आहेत.
त्यात बीट निरीक्षकांचाही समावेश आहे. क क्षेत्रीय कार्यालयाच्या धडक कारवाई पथकात त्या दोन बीट निरीक्षकांचा समावेश होता. अतिक्रमण कारवाई करताना 29 मार्चला दंडाच्या पावतीमध्ये अफरातफर केल्याची तक्रार पालिकेस 30 मार्चला प्राप्त झाली.
चौकशीत हातगाडी विक्रेते राजेंद्र मटके यांच्याकडून दोन हजार रूपये दंडापोटी घेतले. विक्रेत्यांला दिलेल्या पावतीवर (क्रमांक 387753) दोन हजारांची रक्कम लिहली आहे.
मात्र, पावती पुस्तकावरील त्याच क्रमांकावरील पावतीवर एक हजार अशी रक्कम लिहली आहे. समान क्रमांकाच्या पावतीवर स्वाक्षरी व रक्कमेत भिन्नता आढळून आली आहे. या प्रकरणी दोघांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.
मात्र, त्यांनी केलेला खुलासा संयुक्तिक नसल्याने क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे यांच्या 18 एप्रिलच्या पत्रावरून निदर्शनास येते. शासकीय रक्कमेचा अपहार केल्याबद्दल खातेनिहाय चौकशीचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.