

Pune: कोथरूड परिसरात सातत्याने डुकरांचा मृत्यू होण्याचे कारण अखेर समोर आले आहे. या डुकरांवर विषप्रयोग करण्यात आल्याचे त्यांच्या शवविच्छेदनातून उघड झाले आहे. या प्रकरणी महापालिकेच्या आरोग्य विभागाने भरारी पथक नेमले असून, ते परिसरात तपासणी करीत आहे.
कोथरूडमध्ये भारती नगर नाला आणि भिमाले कॉर्नर परिसरात ६ फेब्रुवारीपासून मृत डुकरे आढळून येत आहेत. आतापर्यंत या परिसरात ५४ मृत डुकरे आढळली आहेत. यातील एका डुकराचे शवविच्छेदन करण्यात आले. पशुसंवर्धन विभागाच्या रोग नियंत्रण केंद्राने या डुकराच्या अवयवांची तपासणी केली. डुकराच्या अवयवांमध्ये कार्बामेट हे विष आढळून आले.