

प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे: कर्करोगाच्या निदानासाठी करण्यात येणार्या ’पेट स्कॅन’ या तपासणीसाठी खासगी रुग्णालयांमध्ये 20 ते 25 हजार रुपये खर्च येतो. गरीब रुग्णांसाठी हे दर आवाक्याबाहेरचे आहेत. महापालिकेने गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात पेट स्कॅन सेंटर सुरू करण्याची घोषणा केली होती. मात्र, ही घोषणा अद्याप कागदावरच राहिलेली आहे. सध्या केवळ ससून या एकाच शासकीय रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध आहे.कर्करोगाचे निदान झालेल्या 90 टक्क्यांहून जास्त रुग्णांना पॉझिट्रॉन एमिशन टोपोग्राफी (पेट) स्कॅन करावे लागते.
पेट स्कॅन करण्यासाठी खासगी रुग्णालयांमध्ये 20 ते 25 हजार रुपये खर्च येतो. तसेच, शहरातील बोटावर मोजण्याइतक्याच खासगी रुग्णालयांमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. ससून रुग्णालयात सीजीएचएस दरांनुसार 5 ते 6 हजार रुपयांमध्ये पेट स्कॅन तपासणी केली जात आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये ससूनमध्ये तपासणी सुरू करण्यात आली, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. यल्लपा जाधव यांनी दिली.
पुणे महापालिकेच्या 2023-24 च्या अंदाजपत्रकात नागरिकांसाठी परवडणार्या दरात पेट स्कॅन सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा करण्यात आली होती. सारसबागेसमोरील ठाकरे कलादालनाच्या बाजूच्या इमारतीत पेट स्कॅन सेंटर सुरू केले जाणार आहे. शहरी गरीब योजनेतील सदस्यांना मोफत, तर इतर रुग्णांना केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेतील दरांपेक्षा 1 टक्के कमी दराने तपासणी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. मात्र, ही सुविधा कधी सुरू होणार, असा प्रश्न विचारला जात आहे.
कसे केले जाते पेट स्कॅन?
कर्करोग, हृदयरोग आणि मेंदूच्या विकारांसह विविध प्रकारचे ट्युमर ओळखण्यात पेट स्कॅनची मदत होते. तपासणीसाठी इंटरव्हेन्शनल रेडिऑलॉजिस्टची आवश्यकता असते. स्कॅन मशिनची किंमत अंदाजे 80 कोटी रुपये इतकी असते. पेट स्कॅन करण्यापूर्वी रुग्णाला ग्लुकोजसदृश रेडिओ अॅक्टिव्ह पदार्थ (एफडीजी) दिला जातो.
‘एफडीजी’च्या साहाय्याने शरीरातील ट्युमर ओळखता येतात आणि ‘सीटी स्कॅन’च्या साहाय्याने त्याच्या इमेज मिळवल्या जातात. ‘एफडीजी’ दिल्यानंतर आणि स्कॅनपूर्वी रुग्णाला 45 मिनिटे ‘वेटिंग पिरियड’ दिला जातो. स्कॅनसाठी साधारण 15-20 मिनिटे लागतात. त्यानंतर 1 तास निरीक्षणाखाली ठेवले जाते. रुग्णाला संपूर्ण स्कॅनसाठी साधारणपणे 2 तास लागतात. थायरॉइड ग्लँड, यकृत, किडनी आदी अवयव किती कार्यक्षमतेने काम करत आहेत, यासाठी ‘स्पेक्ट स्कॅन विथ गामा कॅमेरा’चा उपयोग होतो.
खासगी रुग्णालयांमध्ये पेट स्कॅन करण्यासाठी 20 हजार रुपयांपेक्षा जास्त खर्च येतो. आर्थिक निम्न स्तरातील रुग्णाला इतके शुल्क भरणे शक्य नसते. यासाठी ससून रुग्णालयात पेट स्कॅन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. दररोज 5 ते 6 रुग्णांचे पेट स्कॅन केले जात आहे. पाच ते साडेपाच हजार रुपये शुल्क भरणे परवडणारे नसल्यास समाजसेवकांच्या माध्यमातून निधी मिळवून गरजू रुग्णांची मोफत तपासणी केली जाते.
- डॉ. एकनाथ पवार, अधिष्ठाता, ससून सर्वोपचार रुग्णालय
महापालिकेचे पेट स्कॅन सेंटर ठाकरे कलादालनाशेजारील जागेत सुरू केले जाणार आहे. ‘पीपीपी तत्त्वा’वर सेंटर सुरू केले जाईल. नागरिकांना परवडणार्या दरामध्ये पेट स्कॅन सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. साधारणपणे सहा महिन्यांमध्ये ही सुविधा सुरू होण्याची शक्यता आहे.
- डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका