सरकारी शाळा, नको रे बाबा! साडेसहा टक्क्यांनी विद्यार्थिसंख्या घटली

दोन वर्षांत विद्यार्थिसंख्या तब्बल साडेसहा टक्क्यांनी घटली; असरच्या अहवालात धक्कादायक माहिती उघडकीस
Pune News
सरकारी शाळा, नको रे बाबा! साडेसहा टक्क्यांनी विद्यार्थिसंख्या घटली File Photo
Published on
Updated on

पुणे: राज्यातील सरकारी प्राथमिक शाळांमध्ये 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांचा टक्का दिवसेंदिवस घसरत आहे. 2022 च्या तुलनेत 2024 मध्ये तब्बल साडेसहा टक्क्यांनी विद्यार्थिसंख्या घटली आहे. 2018 ला 61.6 टक्के, 2022 ला 67.4 टक्के आणि 2024 ला 60.9 टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.

2019 नंतरचा कोरोना काळ विचारात घेतला तरी 2018 च्या तुलनेत देखील विद्यार्थी घटल्याचेच स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश करण्याची पालकांची मानसिकताच नसल्याची धक्कादायक माहिती असर संस्थेच्या अहवालात स्पष्ट झाली आहे.

देशाच्या आणि विविध राज्यांच्या शैक्षणिक स्थितीच्या सद्यःस्थितीवर प्रकाश टाकणारा असर अहवाल मंगळवारी (दि. 28) प्रकाशित झाला. राज्यातील 33 जिल्ह्यांमधील 987 गावांमध्ये वय वर्ष 3 ते 16 मधील 33 हजार 746 विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. सर्वेक्षणात पूर्व प्राथमिक (वयोगट 3-5), प्राथमिक (वयोगट 6-14) आणि मोठी मुले (वयोगट 15-16) या गटांमधील विद्यार्थ्यांचा सहभाग आहे.

सर्वेक्षणात पहिली व दुसरीमधील वाचन व गणितीय क्रिया यामध्ये विद्यार्थ्यांची संपादणूक व अध्ययन स्तर वाढल्याचे दिसून आले. तिसरीमधील पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यामध्ये कोरोनामध्ये झालेला अध्ययन क्षय भरून काढण्यात येत आहे असे दिसून आले. शासकीय शाळांमध्ये वाचनामध्ये 10.9 टक्के प्रगती दिसून येते तर खासगी शाळांमध्ये वाचनामध्ये 8.1 टक्के प्रगती दिसून आली. गणितीय क्रियांमध्ये शासकीय शाळांमध्ये 13.1 टक्के प्रगती दिसून आली. तर खासगी शाळांमध्ये 11.5 टक्के प्रगती दिसून आली. तिसरीतील मुले जी दुसरीच्या पातळीचे वाचन करू शकतात याचे महाराष्ट्राचे प्रमाण देशपातळीपेक्षा 10 टक्क्यांनी जास्त आहे.

तिसरीमध्ये गणितीय क्रियांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये महाराष्ट्र हा देशातील पहिल्या पाच राज्यांमध्ये आहे. 2022 च्या तुलनेमध्ये 2024 मध्ये यात 13 टक्केची वाढ दिसून आली. 5 वीमध्ये विद्यार्थ्यांपैकी 2022 मध्ये 55.5 टक्के विद्यार्थी हे दुसरीचे वाचन करू शकत होते तर 2024 मध्ये 59.6 टक्के विद्यार्थी दुसरीचे वाचन करू शकतात. वाचन क्षमतेमध्ये 4 टक्क्यांची वाढ दिसून आली. भागाकार करण्यामध्ये 19.6 टक्के विद्यार्थी हे 2022 मध्ये भागाकार करू शकत होते तर 2024 मध्ये याचे प्रमाण 8 टक्क्यांनी वाढून 27.6 टक्के झाले आहे.

वय वर्ष 15 ते 16 यामध्ये 98 टक्के विद्यार्थी हे शाळांमध्ये प्रवेशित आहेत. या वयोगटातील सर्वात कमी शाळाबाह्य विद्यार्थी असणार्‍या राज्यांमध्ये महाराष्ट्र हे एक राज्य आहे. वय वर्ष 14 ते 16 मधील विद्यार्थ्यांच्या डिजिटल साधनांची उपलब्धतेमध्ये राज्यातील 94.2 टक्के विद्यार्थ्यांच्या घरी स्मार्टफोन आहेत.

यातील 84.1 टक्के विद्यार्थी त्याचा वापर करू शकतात. यामधील 19.2 टक्के विद्यार्थ्यांनी स्वतःचा स्मार्टफोन असल्याचे नमूद केले आहे. यातील 63.3 टक्के विद्यार्थी हे शिक्षणाच्या संदर्भात स्मार्टफोनचा वापर करतात तर विविध सामाजिक माध्यमांसाठी 72.7 टक्के विद्यार्थी वापर करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

58.3 टक्के शाळांमध्ये मुलींसाठी वेगळे शौचालय

2024 मध्ये सर्वेक्षकांनी प्राथमिक इयत्ता असलेल्या 15 हजार 728 शासकीय शाळांना भेट दिली. तेथे 8 हजार 504 प्राथमिक शाळा आणि उच्च प्राथमिक किंवा उच्च वर्ग असलेल्या 7 हजार 224 शाळा होत्या. महाराष्ट्रात भेट दिलेल्या शाळांचा आकडा 872 आहे. राज्यातील 80 टक्क्यांहून अधिक शाळांना मागील आणि चालू या दोन्ही शैक्षणिक वर्षात पहिली ते तिसरीपर्यंत उपक्रम राबवण्याच्या सूचना सरकारकडून प्राप्त झाल्या होत्या.

या शैक्षणिक वर्षात 96.7 टक्के शाळांनी शाळा पूर्व तयारी मेळावा-पहिले पाऊल हा कार्यक्रम पहिलीच्या मुलांसाठी राबविल्याचे सांगितले. 90 टक्क्यांहून अधिक शाळांनी शाळेतील सर्व वर्गांना पाठ्यपुस्तके वितरित केल्याची नोंद केली आहे. सर्वेक्षणाच्या दिवशी 95.1 टक्के शाळांमध्ये मध्यान्ह भोजन दिले गेल्याचे दिसून आले, 66.5 टक्के शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची उपलब्धता होती, 58.3 टक्के शाळांमध्ये मुलींसाठी वेगळे आणि वापरण्यायोग्य शौचालयाची सुविधा होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news