

पवनानगर : पुढारी वृत्तसेवा : खडक गेव्हंडे गावातील भैरवनाथ, जोगेश्वरीची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. यात्रेनिमित्त नोकरीनिमित्त गावाबाहेर असलेली मंडळी, तसेच माहेरवासीण महिलांनी आपल्या कुटुंबासह यात्रेत उत्साहात सहभाग घेतल्याचे चित्र दिसून आले.
आ. सुनील शेळके यांच्या आमदारनिधीतून मंदिराची नवीन वास्तू उभारण्यात आली. ग्रामस्थांनी भैरवनाथ मंदिराच्या उत्सवादिवशीच नवीन मूर्तींची प्राणप्रतिष्ठापणा करण्याचे ठरविले.
भैरवनाथ मूर्तीबरोबर श्री गणेश, महादेव, नंदी, अन्नपूर्णा देवी मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. प्राणप्रतिष्ठानेपूर्वी मुर्तींंची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होताच.
या व्यतिरिक्त माहेरवासीणींच्या सहभागाने मिरवणुकीत रंगत आली. महिलांचा फुगडी, ग्रामस्थांचेरिंगण तर भजनाच्या सुरेल आवाजाने मिरवणुकीतील सहभागींमध्ये उत्साह संचारला होता.
डॉ.संदीपजी महिंद्र गुरुजी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. ओंकार पुरोहित यांनी धार्मिक विधी केले. यानंतर भजनाचा कार्यक्रम झाला व आलेल्या पाहुणेमंडळी व ग्रामस्थांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
तसेच संध्याकाळी ग्रामदैवत भैरवनाथ यांची पालखीत मिरवणूक काढण्यात आली व संध्याकाळी करमणूकपर कार्यक्रमाचे आयोजन न करता पावनखिंड चित्रपट दाखविण्यात आला.