बाणेर: औंध येथील सीटी इंटरनॅशनल स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेने कोणतीही पूर्वकल्पना न देता शुल्कवाढ केल्याचा आरोप करीत विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेत आंदोलन केले. या वेळी शाळा प्रशासनाचा निषेध करीत पालकांनी शुल्कवाढीला विरोध केला. दरम्यान, शुल्कवाढ परवड नसेल, तर मुलांची शाळा बदला, असे बेजबाबदार वक्तव्य शाळेच्या मुख्याध्यापिकेने केल्याचा आरोपही पालकांनी केला आहे.
या आंदोलनात सुमारे शंभर पालक सहभागी झाले होते. शाळेने वार्षिक शुल्कात बारा हजार रुपयांची वाढ केली आहे. तर क्रीडा शुल्क म्हणून सात हजार रुपये भरणे अनिवार्य केले आहे. शाळेला मैदान नसल्याने हे शुल्क अनिवार्य करण्यास पालकांनी विरोध दर्शवला आहे. भाजपच्या युवा मोर्चाचे राज्य सचिव सौरभ कुंडलीक यांनी पालक व मुख्याध्यापिका यामध्ये संवाद घडवण्याचा प्रयत्न केला.
पालक शिरीष पवार म्हणाले की, शाळेला खेळाचे मैदान नाही, तरीही शाळेने क्रीडा शुल्क म्हणून प्रतिविद्यार्थी सात हजार रुपये शुल्क बंधनकारक केले आहे. दुसर्यांची मैदाने चालवण्यासाठी आमच्याकडून पैसे वसूल केले जात आहेत.
शाळेने केलेली शुल्क वाढ परवड नसेल, तर तुमची मुले ज्या शाळेत शिकवण्या व्यतिरिक्त कोणतेही उपक्रम घेतले जात नाहीत अशा किंवा महापालिकेच्या शाळेत पाठवू शकता, असे बेजबाबदार वक्तव्य शाळेच्या मुख्याध्यापिकेने केल्याचा या वेळी पालकांनी सांगितले. तसेच या बेजबाबदार वक्तव्याचा पालकांनी या वेळी निषेध केला.
आम्ही नियमानुसार शुल्क वाढ केली आहे. याबाबत सर्व पालकांना कळवण्यात आले आहे.
-अपूर्वा पाटील, मुख्याध्यापिका, सीटी इंटरनॅशनल स्कूल, औंध.
शाळेने आम्हाला शुल्क वाढीसंदर्भात कोणतीही माहिती दिली नाही. तसेच मला फोनवरून संपर्क साधल्याचे शाळेकडून सांगितले गेले आहे. परंतु शाळेकडून मला कोणाचाही फोन आलेला नाही. तसेच प्रत्यक्ष भेटीतही शुल्क वाढीसंदर्भात मला कोणतीही कल्पना दिली गेली नाही. शाळेने ही शुल्क वाढ तातडीने रद्द करावी.
- निसार मुल्ला, पालक