वेल्हे: पुणे शहर व परिसरातील जवळपास एक कोटी नागरिकांची तसेच जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतीची तहान भागवणार्या पानशेत, वरसगाव तसेच खडकवासला धरणातील गाळ काढण्याचे काम शासनाच्या गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानांतर्गत सुरू करण्यात आले आहे. धरणांत साठलेला राडारोडा, गाळ काढल्यामुळे धरणांची पाणी साठवण क्षमता वाढणार आहे, याचा लाभ पुणे शहरासह शेतीला होणार आहे.
खडकवासला जलसंपदा विभाग, जलसंधारण व राजगड तहसील विभागाच्या देखरेखीखाली नाम फाउंडेशन व ग्रीन थंब संस्थेच्या पुढाकाराने तिन्ही धरणातील गाळ काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. शिरकोली व वरघड (ता. राजगड) येथे पानशेत धरण जलसंपदा विभागाचे शाखा अभियंता अनुराग मारके यांच्या हस्ते गाळ काढण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली.
नाम फउंडेशनचे विश्वस्त मल्हार पाटेकर, प्रकल्प अधिकारी गणेश थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली फाउंडेशनचे संघटक व खानापूरचे माजी सरपंच नीलेश जावळकर, शिरकोलीचे सरपंच अमोल पडवळ आदी या वेळी उपस्थित होते.
कुरण बुद्रुक, जांभली येथे ग्रीन थंब संस्थेचे अध्यक्ष कर्नल सुरेश पाटील यांच्या हस्ते गाळ काढण्याचे काम सुरू करण्यात आले. या वेळी संस्थेचे नितीन जावळकर उपस्थित होते. पानशेत धरणाचे शाखा अभियंता अनुराग मारके म्हणाले, पानशेत व वरसगाव धरणातील गाळ काढल्यामुळे धरणांच्या पाणी साठवण क्षमतेत वाढ होणार आहे. काढलेला गाळ स्थानिक शेतकर्यांना मोफत देण्यात येणार आहे. गाळामुळे डोंगर रानातील खडकाळ जमीन पिकांच्या लागवडीखाली येणार आहे. फळबाग लागवडीसाठी गाळाचा उपयोग होणार आहे.
ग्रीन थंब संस्थेचे अध्यक्ष कर्नल सुरेश पाटील म्हणाले, खडकवासला पाणलोट क्षेत्राच्या शेवटच्या टोकाला असलेल्या कुरण, जांभली परिसरात गाळ काढण्याचे काम सुरू आहे. या गाळामुळे स्थानिक शेतकर्यांचे आर्थिक उत्पन्न वाढणार आहे. तसेच धरणाच्या पाणी साठवण क्षमतेत वाढ होणार आहे. यापूर्वी गाळ काढल्यामुळे खडकवासलाची क्षमता 0.20 टीएमसीने वाढली आहे.