संतापजनक! जलवाहिनीत टाकले थायमेट : 12 म्हशींना विषबाधा

संतापजनक! जलवाहिनीत टाकले थायमेट : 12 म्हशींना विषबाधा

तळेगाव ढमढेरे : पुढारी वृत्तसेवा : निमगाव म्हाळुंगी येथे अज्ञात समाजकंटकाने पाण्याच्या जलवाहिनीमध्ये विषारी थायमेट टाकल्याने जलवाहिनीमधून आलेले पाणी जनावरांनी प्यायल्याने तब्बल 12 म्हशींना विषबाधा झाली. ही खळबळजनक घटना शुक्रवारी (दि. 10) घडली. मात्र, त्याबाबत सोमवारी (दि. 13) अधिकृतरीत्या माहिती देण्यात आली. निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील प्रमोद साळुंके यांचा दुग्धव्यवसाय असून, त्यांनी अनेक म्हशी पाळलेल्या आहेत. जनावरांच्या गोठ्यासह घराला पाणीपुरवठा करण्यासाठी सामूहिक विहिरीवरून त्यांनी जलवाहिनी केली आहे. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास अचानक 12 म्हशींना ताप आल्याचे साळुंके यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने पशुवैद्यकीय अधिकार्‍यांशी संपर्क साधला. त्यांनी तातडीने तेथे येत जनावरांसह गोठ्याची पाहणी केली.

जनावरांच्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात विषारी थायमेट आल्याचे समोर आले. या वेळी घराला पाणीपुरवठा होणार्‍या टाकीची पाहणी केली असता त्यामध्ये देखील विषारी थायमेट असल्याचे व पाण्याचा उग्र वास येत असल्याचे समोर आले. त्यावरून अज्ञात समाजकंटकाने विहिरीवरील पाण्याच्या जलवाहिनीमध्ये विषारी थायमेट टाकल्याचे समोर आले. दरम्यान, रांजणगाव गणपतीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गोरक्ष सातकर, डॉ. श्रीधर शिंदे, डॉ. नितीन सोनवणे यांनी तातडीने या जनावरांवर उपचार करत योग्य खबरदारी घेतल्याने सर्व म्हशी धोक्यातून बाहेर आल्या आहेत. प्रमोद साळुंके यांच्या घरातील पाण्यामध्येदेखील विषारी थायमेट असल्याने सर्व पाणी सोडून देत टाक्या व भांडी स्वच्छ करण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. याबाबत शिक्रापूर पोलिसांत तक्रार दाखल करणार असल्याचे साळुंखे यांनी सांगितले.

तीन दिवसांत 150 लिटर दूध शेतात फेकले

प्रमोद साळुंके यांच्या गोठ्यामध्ये समाजकंटकामुळे घडलेल्या प्रकारामुळे जनावरांना विषबाधा झाली. त्यानंतर दररोज डेअरीला देण्यात येणारे 50 लिटर दूध या विषबाधेमुळे कोणत्याही नागरिकांना त्रास नको, म्हणून सर्व दूध काढून शेतात ओतून देणे साळुंके यांनी पसंत केले. असे तीन दिवसांमध्ये तब्बल 150 लिटर दूध त्यांनी शेतात फेकले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news