आपले खासदार होणार चारशे चार : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

आपले खासदार होणार चारशे चार : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : 'आता आपले खासदार होणार चारशे चार, कारण इंडियाच्या नावाने बोगस काम करणार्‍यांवर मी करणार आहे वार', अशा काव्यमय शब्दांमध्ये शुक्रवारी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येत्या लोकसभा निवडणुकांबाबतचा आत्मविश्वास व्यक्त केला अन् आठवले यांची ही काव्यमय आतषबाजी रसिकांसाठीही खास ठरली. 'माय होम इंडिया' संस्थेतर्फे मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या जन्मदिनानिमित्त विविध कलाकारांना आठवले यांच्या हस्ते 'लता मंगेशकर स्मृती पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आले. त्या वेळी आठवले बोलत होते. प्रसिद्ध गायक सुदेश भोसले, माय होम इंडिया संस्थेचे सुनील देवधर या वेळी उपस्थित होते. शर्वरी जमेनीस, सावनी शेंडे, सौरभ काडगावकर, आनंद देशमुख, श्रद्धा गायकवाड, होनराज मावळे आदींचा या पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

'पूर्वांचलामध्ये रामदास आठवले यांचे बरेच चाहते आहेत,' या देवधर यांच्या वक्तव्यासंदर्भात आठवले म्हणाले, 'माझा पक्ष छोटा आहे. मात्र, छोटे पक्षच मोठे होत असतात. भाजपही लहान पक्ष होता. देशात केवळ दोन खासदार होते. मात्र, आता भाजप सर्वात मोठा पक्ष झाला आहे. माझ्या पक्षाचा एकही खासदार नसताना मी केंद्रीय मंत्री आहे. मंत्रिपद जाईल याची अनेक केंद्रीय मंत्र्यांना भीती वाटते. मात्र, माझ्या मंत्रिपदाला धोका नाही.' 'माझ्या मंत्रिपदाला नाही धक्का, कारण मी आहे विचारांनी पक्का', अशी टिप्पणी त्यांनी केली. 'जगाच्या विविध देशांमध्ये भारतीय मोठ्या संख्येने आहेत. मी एका दौर्‍यावर असताना तेथे टॅक्सीमध्ये मला लता मंगेशकर यांची गाणी ऐकायला मिळाली. चौकशी केल्यानंतर बिहारमधील सव्वाशे कुटुंबे तेथे स्थायिक झाली असल्याचे समजले.'

राममंदिराच्या निमंत्रणासंदर्भात रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'अयोध्या येथील राममंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण आपल्याला अद्याप आलेले नाही. अजून बराच अवकाश असल्याने निमंत्रण येईल. निमंत्रण आले तर राममंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला मी जाणार आहे,' असेही आठवले यांनी सांगितले. आठवले म्हणाले की, 'मला प्रभू राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेचे निमंत्रण आलेले नाही. निमंत्रण आले तर मी जाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व जाती-धर्मांचा आदर करण्याचे सांगितले आहे. अनेक गावांमध्ये मला मंदिरामध्ये बोलावतात. आम्हीदेखील बुद्धविहारांमध्ये इतर जातीधर्माच्या लोकांना बोलावतो. राममंदिर हा भाजपचा विषय नाही. राममंदिर हा राजकारणाचा विषय नाही. राममंदिर हा धर्मकारणाचा विषय आहे,' असेही आठवले यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news