पुणे: हवेली तालुक्यात जमीन मोजणी प्रकरणांत मोठी अनियमितता आल्याने हवेली उपअधीक्षक कार्यालयाचे उपअधीक्षक अमरसिंह पाटील यांच्या कार्यालयीन कामकाजाची विभागीय अधिकार्यांची नियुक्ती करून चौकशी करण्याचे आदेश राज्याच्या प्रभारी अप्पर आयुक्त तथा अतिरिक्त संचालक भूमिअभिलेख यांनी दिले आहेत.
हवेली तालुक्यात जमीन मोजणी प्रकरणांत गंभीर स्वरूपाची अनियमितता व प्राधान्यक्रमानुसार मोजणीची प्रकरणे निकालात न काढता वर्षानुवर्षे मोजणीची प्रकरणे प्रलंबित राहात आहेत. तक्रारींची दखल म्हणून राज्याच्या अप्पर जमाबंदी आयुक्त सरिता नरके यांनी चौकशी आदेश दिले आहेत.
त्यामुळे त्यानुसार हवेली तालुका उपअधीक्षक कार्यालयात शासकीय सुट्टीच्या दिवशी म्हणजे 22 मार्च व 23 मार्चला हवेलीचे मोजणी कार्यालय सुरू ठेवून कार्यालयीन तपासणी सुरू होती. अमरसिंह पाटील हे राज्यातील बड्या नेत्यांचे नातेवाईक लागतात. त्यांची चौकशी सुरू झाल्याने प्रशासकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. बारामती, पुणे या ठिकाणी त्यांनी पोस्टिंग केलेल्या आहेत.
शासनाच्या तपासणी पथकामध्ये नाशिक प्रदेशचे भूमिअभिलेख, जिल्हा अधीक्षक रोहिणी सागरे, बाभूळगाव जि. यवतमाळचे उपअधीक्षक प्रतीक मोकाशी, संगमनेर जि. अहिल्यानगरचे उपअधीक्षक भाऊसाहेब पवार, उपअधीक्षक भूमिअभिलेख पैठणचे मुख्यालय सहाय्यक संजय बोरडे, उपअधीक्षक भूमिअभिलेख, इगतपुरीचे भूकरमापक अतुल खैरनार, उपअधीक्षक भूमिअभिलेख, मालेगावचे भूकरमापक अक्षय जाधव यांचा समावेश आहे.
हवेलीच्या मोजणी कार्यालयाची तपासणी जमाबंदी आयुक्तांच्या आदेशाची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली आहे. सलग दोन दिवस हवेली उपअधीक्षक कार्यालयाची तपासणी सुरू राहणार आहे. त्यानंतर चौकशी अहवाल जमाबंदी आयुक्त कार्यालयास सादर करण्यात येणार आहे.
- सूर्यकांत मोरे, जिल्हा अधीक्षक, भूमिअभिलेख पुणे
अमरसिंह पाटील यांनी शासनाच्या नियमांचा भंग केला असल्याचे उघडकीस आले आहे. अनेक वेळा त्यांच्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी आम्ही केली होती. मात्र शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे अनेक नागरिकांना संघर्ष आणि अडचणींचा सामना करावा लागला. चुकीचे काम करणार्या अधिकार्यांची तत्काळ चौकशी करून त्यांचे निलंबन करण्यात यावे, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू.
- रोहन सुरवसे पाटील, माहिती अधिकार