कोथरूडमध्येही पावसाळी लाइनमध्ये केबल; महापालीकेचे खासगी कंपन्यांसोबत साटेलोटे

कोथरूडमध्येही पावसाळी लाइनमध्ये केबल; महापालीकेचे खासगी कंपन्यांसोबत साटेलोटे

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सिंहगड रस्त्यावरील पावसाळी लाइनमध्ये बेकायदेशीरपणे खासगी कंपन्यांच्या ऑप्टिकल फायबर केबल टाकलाचे प्रकार मागील आठवड्यात समोर आले होते. त्यानंतर आता शहरातील इतर भागांतही पावसाळी लाइनमधून केबल टाकल्याचे समोर येत आहे. कोथरूड येथील पावसाळी लाइनमध्ये टाकलेल्या केबल जेसीबीच्या साहाय्याने बाहेर करण्यात आल्याने अधिकारी व कर्मचार्‍यांचे खासगी कंपन्यांसोबत साटेलोटे असण्याची शक्यता बळावत आहे.

ऑप्टिकल फायबरमुळे कचरा साचला

सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानासमोर शनिवारी पाणी साचले होते. महापालिका प्रशासनाने या ठिकाणी पाहणी करण्यासाठी पावसाळी लाइनचे चेंबर उघडल्यानंतर लाइन बंद असल्याचे आढळले. महापालिकेच्या कर्मचार्‍यांनी अधिक पाहणी केली असता पावसाळी लाइनमध्ये चक्क ऑप्टिकल फायबर केबल्स टाकण्यात असल्याचे समोर आले. या केबलमुळे या ठिकाणी कचरा साचला आणि वाहिन्या बंद झाल्याचे समोर आल्याने कर्मचार्‍यांनी त्या केबल कापल्या होत्या. त्यानंतर अशाच प्रकारे पावसाळी लाइनमध्ये केबल टाकण्यात आल्याचे माणिकबाग चौकातही निदर्शनास आले होते.

महापालिकेने कापलेल्या केबल संबंधित कंपनीने परस्पर जोडल्या होत्या. याप्रकरणी महापालिकेने संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यात पत्र दिले होते. संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल होतो न होतो, तोच कोथरूडमध्येही पावसाळी लाइनमध्ये मोठ्या प्रमाणात केबल टाकण्यात आल्याचे समोर आले आहे.

शहरात पावसाळ्यात पाणी साचलेल्या 123 ठिकाणांची महापालिकेच्या आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांनी मागील चार दिवसांत पाहणी केली होती. या पाहणीत अनेक पावसाळी वाहिन्यांमध्ये खासगी कंपन्यांच्या केबल आढळून आल्या, त्यानंतर अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी यांनी सर्व ड्रेनेज तसेच पथ विभागाच्या उपअभियंत्यांची महापालिकेत मंगळवारी (दि. 18) बैठक घेतली. पावसाळी वाहिन्यांतील केबल तत्काळ काढून टाकण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सुरू केलेल्या कारवाईत बुधवारी कोथरूड बसडेपोच्या परिसरात पावसाळी लाइनमध्ये केबल आढळल्या.

जेसीबीने उपसून काढल्या केबल

कोथरूड डेपो येथील पावसाळी लाईनधील काही केबल कर्मचार्‍यांनी कापल्या, त्या ओढून काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर पावसाळी लाइनमधील केबलची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे काही कर्मचार्‍यांनी दोरी बांधून त्या ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या निघत नसल्याने अखेर या केबल काढण्यासाठी जेसीबीची मदत घेण्यात आली. या वेळी मात्र बाहेर आलेल्या केबल पाहून महापालिकेच्या अभियंत्यांनाही मोठा धक्का बसला. या केबल जाळ्यांचा कचरा एवढा मोठा होता की पावसाळी पाणी वाहून जाणेच शक्य नसल्याचे दिसून आले.

पाण्याचा निचरा होण्यासाठी पावसाळी वाहिन्या आहेत. त्यात कोणत्याही केबल अथवा सेवावाहिन्या टाकता येत नाहीत. मी स्वत: आणि आयुक्तांनी शहरात तीन दिवस केलेल्या पाहणीत ही बाब समोर आली. त्यानुसार बैठक घेऊन तत्काळ या केबल काढण्याच्या सूचना देण्यात आल्या.

– पृथ्वीराज बीपी, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news