वाल्हे: जानेवारी महिन्यापासून दिवसेंदिवस उष्णतेत वाढ होत असून, पाण्याचे बाष्पीभवन देखील वाढू लागले आहे. पिंगोरी (ता. पुरंदर) परिसराला सुजलाम सुफलाम करणार्या जय गणेश जलाशयात 21 एप्रिलअखेर फक्त 22 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी आजअखेर 8 टक्केच पाणीसाठा शिल्लक होता. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी 14 टक्के पाणीसाठा जास्त आहे.
सन 1972 मध्ये जय गणेश तलावाची निर्मिती करण्यात आली असून, तेव्हापासून पिंगोरीतील शेती, पिण्याच्या पाण्यासाठी हा जलाशय वरदान ठरला आहे. या जलाशयामुळे पिंगोरी परिसरातील बागायत शेतीचे क्षेत्र वाढले आहे.
मागील दोन वर्षी अल्प पर्जन्यमान झाल्याने हा जलाशय पूर्णपणे भरला नव्हता. मागील वर्षी ऐन पावसाळ्यातच टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. यावर्षी ऑगस्ट महिन्याअखेर गोकुळाष्टमी दिवशीच जय गणेश जलाशय ओसांडून वाहू लागल्यानंतर येथील ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात जलपूजन केले होते.
दुष्काळी परिस्थितीमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट व गावातील रहिवासी बाबा शिंदे यांच्या विशेष प्रयत्नाने तसेच रोटरी क्लबच्या सहकार्यातून सामाजिक संस्थांनी पुरविलेल्या यंत्रसामग्रीसह ग्रामस्थांनी केलेल्या श्रमदानातून गाळ काढून हा जलाशय पुनर्जीवित करण्यात आला. त्यामुळे परिसरातील हजारो एकर जमीन ओलिताखाली आली आहे. सद्यःस्थितीत जलाशयातील पाणीसाठा अल्प असल्याने तसेच पुढील महिनाभरात पाऊस पडला नाही, तर जलाशयातील पाणीसाठा मृत साठ्यात जाईल, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
दिवसेंदिवस उष्णता वाढू लागल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी खालावू लागल्याने पिंगोरी येथील जय गणेश जलाशयामधील काही प्रमाणात पाणी पिण्यासाठी सोडण्यात आले होते. यामुळे काही भागांतील जमिनीची पाणीपातळी वाढली असली तरी शिंदेनगर, कवडेवाडी येथील पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनत चालला आहे. या परिसरात श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टद्वारे लगेचच टँकर सुरू करण्यात येणार आहे. शासनाने या गावातील पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी ठोस उपाययोजना करावी.
- संदीप यादव, सरपंच, पिंगोरी
पिंगोरी परिसरात मागील वर्षी ऐन पावसाळ्यात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस संततधार पाऊस पडल्याने जय गणेश जलाशय पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला होता. यावर्षी पाण्याची कमतरता जाणवणार नाही, अशी शक्यता असताना वाढत्या उष्णतेने होत असलेले बाष्पीभवन तसेच जलाशयातून पाणी सोडल्याने सध्या जलाशयात 22 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे.
- अविनाश जगताप, शाखाधिकारी, जलसंपदा विभाग, गराडे