

Pune: महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यातील गरीब व गरजू लोकांना दहा रुपयांत भोजन उपलब्ध व्हावे, यासाठी शिवभोजन थाळीची योजना सुरू करण्यात आली. मात्र, सरकारकडून अनुदान वेळेत मिळत नसल्याने केंद्रचालकांना आर्थिक भुर्दंड पडत आहे. परिणामी, अनेक चालकांनी केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्ह्यातील 11 तालुक्यांत असलेली 40 शिवभोजन केंद्र सध्या केवळ 7 तालुक्यांमध्ये 19 ठिकाणी इतकीच उरली आहेत. या केंद्रांना गेल्या पाच महिन्यांपासून अनुदानही मिळाले नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे गरिबांना मिळणारी स्वस्तातील थाळी दुरापास्त होत असल्याचे चित्र आहे. 2023 च्या मार्च अखेर जिल्ह्यात अशी 40 केंद्र सुरू होती.
जिल्ह्यात कोरोना काळात अनेकांना आधार देणार्या शिवभोजन केंद्रांची संख्या 40 इतकी होती. मात्र, अवेळी मिळणारे अनुदान, नागरिकांचा न मिळणारा प्रतिसाद यामुळे गेल्या पावणेदोन वर्षांत जिल्ह्यातील तब्बल 21 केंद्र बंद झाली आहेत.
नोव्हेंबर अखेर जिल्ह्यात केवळ 19 केंद्र सुरू असल्याची धक्कादायक माहिती जिल्हा पुरवठा अधिकार्यांच्या कार्यालयातून प्राप्त झाली आहे. अनुदानाव्यतिरिक्त विकलेल्या थाळ्यांचा हिशेब ठेवणे, सीसीटीव्ही लावणे, त्याची पडताळणी तहसीलदारांकडून होणे अशा जिकिरीच्या अटी तसेच नागरिकांचा अल्प प्रतिसाद ही केंद्र बंद होण्यामागील कारणे आहेत.
ग्रामीणसाठी 25, तर शहरीसाठी 40 रुपयांचे अनुदान
दहा रुपयांच्या या शिवभोजन थाळीत 2 चपात्या, एक वाटी भाजी, भात व एक वाटी वरण दिले जाते. या केंद्रांना राज्य सरकारकडून प्रतिथाळी अनुदान दिले जाते. त्यात ग्रामीण भागातील केंद्रांसाठी 25 रुपये, तर शहरी भागासाठी 40 रुपयांचे अनुदान दिले जाते.
जिल्हा पुरवठा विभागाने 23 जूनपर्यंत शिवभोजन केंद्रांना अनुदान वितरित केले आहे. यासाठी राज्य सरकारकडून एकूण 2 कोटी 82 हजार 51 रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. संबंधित तहसीलदारांकडून सप्टेंबरपर्यंत शिवभोजन प्रमाणपत्र प्राप्त झाले असून, या कालावधीचे अनुदान शिवभोजन केंद्रचालकांना चार-पाच दिवसांत वितरित करण्यात येईल.
- महेश सुधळकर, माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी