कांदा रोपे तयार करण्यासाठी टाकलेल्या बियाण्यांची उगवण क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात कांदा रोपांची टंचाई निर्माण होणार असून कांद्याच्या उत्पादनातही घट होणार असल्याने शेतकरी चिंतेत आहे. त्यामुळे या कांदा बियाण्यांची कृषी विभागाने दुकानात जाऊन तपासणी करावी, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे. आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात डिंभे धरणाच्या उजव्या कालव्या लगतच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांदा पिकाची लागवड केली जाते. चार महिन्यांत निघणारे हे पीक चांगल्या स्वरूपात उत्पन्न देते व बाजारभाव मिळाला तर आर्थिक फायदाही होतो.
कांदा बियाण्यांची उगवण क्षमता घटली त्यामुळे शेतकरी कांदा पिकाची लागवड करतात. यावर्षी कांद्याला चांगला बाजारभाव राहिल्याने पुढील वर्षी कांद्याच्या लागवडीत वाढ होण्याची शक्यता होती. त्या दृष्टीने यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कांद्याचे बियाणे खरेदी करून त्यापासून रोपे बनवण्यासाठी बियाणे शेतात टाकली. परंतु, अनेक शेतकऱ्यांनी टाकलेले बियाणे हे उगले नसल्याने कांदा रोपांचे प्रमाणही कमी दिसून येत आहे. त्यामुळे लागवडीसाठी रोपांची उपलब्धता कमी होणार आहे.
त्यामुळे येणाऱ्या कालखंडामध्ये कांदा रोपांची मागणी ही जास्त राहणार असून कांदा लागवडीवर परिणाम होणार आहे. त्यामुळे कांद्याची लागवड कमी होईल अशी शक्यता शेतकरी वर्तवत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी कृषी दुकानातून कांदा बियाणे घेतले आहे. त्यामुळे बियाण्यांची उगवण क्षमता तपासण्याची गरज निर्माण झाली आहे. कृषी विभागाने दुकानात जाऊन विक्रीसाठी ठेवलेले कांद्याचे बी तपासावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केले आहे.