

कांदा उत्पादक शेतकर्यांचा नवीन कांदा बाजारात येण्यास सुरुवात होताच बाजारातील कांद्याचे भाव कोसळण्यास सुरुवात झाली आहे. खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती चाकणच्या महात्मा फुले उपबाजारात कांद्याच्या भावातील घसरण सुरूच आहे. कांद्याचा भाव क्विंटलला 1500 ते 2000 रुपयांपर्यंत घसरला. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. भाव कमी झाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.
नोव्हेंबर महिन्यात कांद्याला उच्चांकी बाजारभाव मिळत होता. चांगला जुना कांदा सुमारे 70 रुपये किलोपर्यंत विकला गेला. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. त्यानंतर केंद्र सरकारने अफगाणिस्तानचा कांदा आयात केला. त्यामुळे कांद्याचे बाजारभाव पडतील या विचाराने शेतकर्यांनी जुन्या कांद्याबरोबर नवीन कांदा काढणीस सुरुवात केली.
जरी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात अफगाणिस्तानचा कांदा बाजारात येत होता, तरी कांद्याचा भाव 50 ते 60 रुपये एवढा भाव टिकून होता. मात्र, मागील काही दिवसांत ढगाळ वातावरण झाल्याने शेतकर्यांनी कांदा काढणीस मोठ्या प्रमाणावर सुरुवात केली. त्यामुळे बाजारभाव गडगडायला सुरुवात झाली.
7500 क्विंटल आवक
चाकणच्या बाजारात बुधवारी (दि. 18) सुमारे 7,500 क्विंटल कांद्याची आवक झाली. लिलावात 1 नंबर कांदा 2,2500 ते 2000, 2 नंबर कांदा 2,000 ते 1,800, गोल्टी कांदा 1,500 ते 1,200 असा क्विंटलला बाजारभाव मिळाला, असे सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी सांगितले.
कांद्याचे भाव घसरण्यामागे वाढलेला आवकेचा दबाव आणि निर्यातीमधील अडथळे ही कारणे आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या कांद्याचे भाव कमी झाले आहेत. शेजारील देशांचा कांदा बाजरात आला आहे. तसेच, बांगलादेशात आपल्या कांद्याऐवजी पाकिस्तानच्या कांद्याला पसंती मिळत आहे. भारताच्या कांदा निर्यातीवर आजही 20 टक्के नियार्त शुल्क आहे. याचा फटका कांद्याच्या भावाला बसत आहे. सरकारने कांदा निर्यात शुल्क तातडीने मागे घ्यावी.
- विजयसिंह शिंदे, सभापती, खेड बाजार समिती.