

महाळुंगे पडवळ :डिंभे धरणाच्या लाभक्षेत्रात येणार्या अनेक गावांमध्ये बारामाही पाणी उपलब्ध असल्याने नगदी पीक म्हणून रब्बी हंगामात सुमारे 6 हजार 400 हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवड करण्यात आली होती. यंदा कांद्याचे उत्पन्नदेखील चांगले निघाले; मात्र कांद्याच्या बाजारभावात घट झाल्याने आंबेगाव तालुक्यातील असंख्य शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
यंदाचे वातावरण कांदा पिकाला पोषक असल्याने बंपर उत्पादन झाले. कांदा काढणीनंतर ओल्या कांद्याला एप्रिल-मे महिन्यात सुमारे 150 ते 180 रुपये प्रति 10 किलो बाजारभाव होता. असंख्य शेतकर्यांनी वाढीव दराने कांदा विक्री जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात होईल या आशेने कांदा साठवणूक करून ठेवला. तालुक्यात 3 हजार 459 कांदा बराकीमधून सुमारे 7 हजार मेट्रिक टन साठवलेला कांदा आता विक्रीसाठी टप्प्याटप्प्याने बाजारपेठेत येत आहे.
मागील वर्षी एप्रिल 2024 मध्ये कांद्याचे भाव 60 ते 100 रुपये प्रति 10 किलो होते, तर जुलै 2024 मध्ये हेच दर 200 रुपयांपर्यंत गेले होते. ओल्या कांद्याचे भाव 180 रुपयांपर्यंत असतानाही शेतकर्यांनी कांदा साठवणूक केली. आता जुलै 2025 मध्ये कांद्याचे भाव 140 रुपये प्रति 10 किलो आहेत. गेले महिनाभर कांद्याच्या बाजारभावात घट येत आहे. त्यातच कांदा सडण्याचे,
खराब होण्याचे तसेच दुय्यम दर्जाचा होण्याचे प्रमाण वातावरणातील बदलांमुळे वाढत चालले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
शेतकर्याचे वर्षभराचे आर्थिक गणित कांदा या नगदी पिकावर अवलंबून असते. लाख रुपये ते पाच लाख रुपयांपर्यंत प्रतिवर्षी कांद्याच्या पिकातून शेतकर्याला मागील तीन वर्षात लाभ झाला आहे. यंदा मात्र उलटे चित्र दिसत आहे. कांदा पीक शेतकर्यांना रडवणार असे चित्र सध्यातरी दिसत असल्याने जिल्ह्याच्या उत्तर भागातील जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेड तालुक्यातील शेतकर्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. गावच्या पारावर बसून जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांची नाही तर कांद्याच्या बाजारभावाची चर्चा मात्र सर्वत्र सुरू आहे.
युती शासन शेतकरीविरोधी आहे. सन 2020 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत लाखो टन कांदा खरेदी करून शेतकर्यांना दिलासा दिला होता, याची आठवण या शासनाला करून द्यावी लागेल.
- बाळासा- बाळासाहेब इंदोरे, तालुकाध्यक्ष, किसान काँग्रेस, आंबेगावहेब इंदोरे, तालुकाध्यक्ष, किसान काँग्रेस, आंबेगाव
भरमसाट खते, औषधे व वाढीव मजुरी देऊन यंदा कांदा पिकवला आहे. बाजारभावात दिवसेंदिवस घट होत असल्याने शेतकर्यांमध्ये शासनाबाबत अस्वस्थता आहे. नाफेडने बाजारभावापेक्षा जास्त दराने कांदा खरेदी करावा.
अनिल पडवळ, कांदा उत्पादक शेतकरी, महाळुंगे पडवळ