टाकळी हाजी : पुढारी वृत्तसेवा : कांद्याच्या पैशावर बँकांची कर्जे नवी जुनी करता येतील, मुलांची शाळेची राहिलेली फी भरता येईल, लग्न, समारंभात खर्च करता येईल, एवढेच नव्हे तर आपल्या कुटुंबासाठी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवीन काहीतरी घेता येईल, शेतकर्यांच्या या आणि अशा अनेक स्वप्नांचे इमले शासनाच्या कांदा निर्यातबंदीच्या एका धोरणामुळे कोसळले आहेत. शिरूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. रब्बी हंगामातील कांद्यासाठी हवामान पोषक असल्यामुळे साडेचार महिन्यांत कांद्याचे उत्पादन चांगले येते. एकेकाळी दुष्काळी समजल्या जाणार्या शिरूर तालुक्यात चासकमान, मीना शाखा, डिंभे आणि घोड या चार कालव्यांमुळे क्षेत्र ओलिताखाली आले असून, कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.
कांद्याच्या उत्पादनासाठी कांदा बी, नांगरट , मशागत, रासायनिक खते, वीजबिल, तसेच मजुरीचे दर या सर्व उत्पादन खर्चात भरमसाट वाढ झाली आहे. यावर्षी चालू हंगामात अनेक वेळा खराब हवामान, अवकाळी पाऊस, गारपीट अशा अनेक संकटांचा सामना करत शेतकर्यांनी कांदा पीक घेतले आहे. त्यामुळे हा कांदा साठवला, तर जास्त दिवस टिकेल की नाही याबद्दल मात्र शेतकर्यांच्या मनात शंका आहे. पडलेले बाजारभाव आणि मार्चअखेर या दुहेरी संकटांत सापडल्याने निवडणुकांच्या तोंडावरच कांदा उत्पादक शेतकर्यांच्या डोळ्यांत पाणी पाहावयास मिळत आहे.
हेही वाचा