

सततच्या ढगाळ हवामान आणि दाट धुक्यामुळे कांदा पीक संकटात सापडले आहे. आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील कांदा उत्पादक शेतकर्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून कांदा पिकावर औषध फवारणी सुरू केली आहे. अगोदरच कांदारोपे, मजूरटंचाई; त्यात आता महागड्या औषध फवारणीमुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
रब्बी हंगामात तालुक्याच्या पूर्व भागात पारगाव, शिंगवे, काठापूर, रांजणी, नागापूर, वळती, गांजवेवाडी, भागडी आदी परिसरात कांदा पीक मोठ्या प्रमाणावर शेतकर्यांनी घेतले आहे. यंदा कांद्यांना बाजारभाव देखील चांगले मिळाले आहे. त्यामुळे लागवड क्षेत्रात देखील मोठी वाढ झाली आहे.
यंदा कांदा लागवडीसाठी रोपांचा तुटवडा निर्माण झाला. परतीच्या पावसाचा फटका कांदा रोपांना बसला होता. त्यानंतर कांदा लागवडीसाठी मजूर मिळत नव्हते. शेतकर्यांनी जादा मजुरी देऊन कांदा लागवडींची कामे पूर्ण करून घेतली. आता कांदा पीक एक महिन्याचे झाले आहे. परंतु, आता निसर्गाच्या लहरीपणाचा फटका कांदा पिकाला बसू लागला आहे. सततचे ढगाळ हवामान, दाट धुक्यामुळे कांदा पिकावर मावा, करपा, रसशोषित किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कांद्याच्या पातींना पीळ पडला आहे. त्यामुळे किडीरोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकर्यांनी कांदा पिकावर महागड्या औषधांची फवारणी सुरू केली.