आळेफाटा: जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा उपबाजारात कांदा आवक घटलेलीच आहे. मंगळवारी (दि. 18) झालेल्या लिलावात कांद्यास प्रतिदहा किलोस 211 रुपये कमाल भाव मिळाला असल्याची माहिती सभापती संजय काळे, उपसभापती प्रीतम काळे यांनी दिली.
आळेफाटा उपबाजारात सध्या उन्हाळ गावरान कांद्याची आवक सुरू आहे. महिन्याच्या सुरुवातीस येथे कांद्यास प्रति 10 किलोस 270 रुपये कमाल भाव मिळत होता. त्या वेळेस आवकही कमी होत होती. यानंतर गावरान कांदा विक्रीस आला अन् कांदा भावात मोठी घसरण होऊन प्रति 10 किलोस 200 रुपयांचे दर मिळाले. सध्या देखील हे दर असेच स्थिर असल्याचे लिलावात पाहवयास मिळत आहे. कांदा भावातील घसरणीमुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाले आहेत.
रब्बी हंगामात लागवड झालेला गावरान कांदा काढणी सध्या वेगात सुरू आहे. यामुळे यापुढील काळात कांदा विक्रीस येण्याचे प्रमाण वाढणार आहे. भावात वाढ होईल अशी आशा शेतकरीवर्गाला लागलेली आहे. मंगळवारी झालेल्या लिलावात शेतकरीवर्गाने 15 हजार 325 गोणी कांदा विक्रीस आणला असल्याची माहिती सचिव रूपेश कवडे, कार्यालयप्रमुख प्रशांत महांबरे यांनी दिली.
मंगळवारी कांद्यास प्रतिदहा किलोस मिळालेले भाव
एक्स्ट्रा गोळा : 190 ते 211
सुपर गोळा : 175 ते 190
सुपर मीडियम : 155 ते 170
गोल्टी व गोल्टा : 115 ते 140
बदला व चिंगळी : 70 ते 130