

घरी जाणार्या 52 वर्षीय व्यक्तीची दुचाकी गुंजवणी नदीपात्रावरील बंधार्याच्या कठड्याला लटकलेल्या अवस्थेत दिसून आली. नदीपात्रात बेशुद्धावस्थेत असलेल्या व्यक्तीला रुग्णालयात नेले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. हा प्रकार संशयास्पद असल्याचा आरोप मृताच्या नातेवाइकांनी केला आहे. या घटनेबाबत तपास सुरू असल्याचे राजगड पोलिसांनी सांगितले.
गणपत गेनबा खुटवड (वय 52, रा. हातवे, ता. भोर) असे या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना रविवारी (दि. 22) दिडघर ते हातवे मार्गावरील गुंजवणी नदी बंधारा पुलावर रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेची माहिती समजताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. या वेळी नदीपात्रात बेशुद्धावस्थेत आढळून आलेल्या खुटवड यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
सहायक पोलिस निरीक्षक रमेश गायकवाड, मंगेश कुंभार यांनी घटनास्थळी धाव घेतली. या वेळी गणपत खुटवड यांची दुचाकी बंधार्यावरील मोरीच्या एक नंबरवर होती. तर नदीपात्राच्या मध्यभागी खुटवड बेशुद्धावस्थेत आढळून आले. संदीप खुटवड यांनी हा प्रकार संशयास्पद असल्याचे सांगून याप्रकरणी राजगड पोलिसांना तीन संशयितांची नावे दिल्याचे सांगितले. आणखी दोघेजण यात सहभागी असल्याचे त्याचे म्हणने आहे. याप्रकरणी राजगड पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे. चौकशीनंतर गुन्हा दाखल करणार असल्याचे राजगड पोलिसांनी सांगितले.