आळंदी : पुढारी वृत्तसेवा
आळंदी (Alandi News) येथील एका महाराजाने आपल्याच खासगी वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या बारा वर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आळंदी पोलिसांनी त्या महाराजाला अटक करत गजाआड केले आहे. व्यकंटेश काशिनाथ माडनूर असे त्या महाराजाचे नाव आहे.
माडनूरची आळंदीत एक अन्नदान संस्था आहे. यात बारा वर्षाचा अल्पवयीन मुलगा वारकरी शिक्षण घेत आहे. तो शनिवारी (दि.१७) पहाटे झोपला असताना महाराजाने त्याला उठवून टीव्ही असलेल्या खोलीत नेले. त्याला मोबाईल खेळायला देत त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. याला मुलाने विरोध केला. पण त्याला गप्प करत शांतपणे सर्व सहन करायला लावल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. (Pune Crime)
महाराजावर बालकांचे लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम कलम ४, ६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास आळंदी पोलीस करत आहेत.