Political News: शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघासाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी महायुतीकडून ज्ञानेश्वर कटके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यापूर्वी महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदार अशोक पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अशोक पवार यांच्याविरोधात बंडखोरी झाली नाही. मात्र, महायुतीला बंडखोरीची लागण झाली आहे.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहाकरी बँकेचे संचालक व भाजप नेते प्रदीप कंद तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे हवेलीचे नेते शांताराम कटके आणि भाजप पुणे जिल्हा उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. या तिघांची मनधरणी दोन्ही पक्षांतील वरिष्ठांना करावी लागणार असून, या तिघांनी उमेदवारी अर्ज ठेवल्यास अथवा एका जरी उमेदवाराने बंडखोरी कायम ठेवली, तर ती महायुतीला डोकेदुखी ठरू शकते.
हवेलीचे भाजप नेते प्रदीप कंद यांच्या उमेदवारीमुळे शिरूर-हवेलीच्या निवडणुकीने एक नवीन वळण घेतले असून, त्यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळी अनेक भाजप नेते हजर होते. दुसरीकडे, काही भाजप नेते हे ज्ञानेश्वर कटके यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी उपस्थित होते. त्यामुळे भाजपमध्येच दोन गट पडलेत की काय? असे वाटत असले तरी ही भाजपची राजकीय खेळी आहे की काय? हे येत्या चार दिवसांमध्ये समजेल.