

पुणे: केंद्र सरकारने क्यूआर कोडसहित नवीन पॅन कार्ड (पॅन 2.0) आणले असले, तरी सध्याचे पॅन कार्ड रद्द होणार नाही, तसेच पॅन क्रमांकही बदलला जाणार नाही. केवळ पॅन कार्डची गुणवत्ता वाढविण्यात आली असून, त्याचे फायदे घेण्यासाठी सर्वांनी नवीन ई-पॅन कार्डसाठी अर्ज करावा, असे मत ज्येष्ठ सनदी लेखापाल डॉ. दिलीप सातभाई यांनी व्यक्त केले.
पॅन सेवांचा दर्जा वाढविण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने पॅन 2.0 उपक्रमाची घोषणा केली. त्या पार्श्वभूमीवर सजग नागरिक मंचातर्फे पॅन 2.0 : तुमचे जुने पॅनकार्ड चालणार की नवीन काढावे लागणार, या विषयावर मासिक चर्चासत्राचे आयोजन केले होते. त्या वेळी डॉ. सातभाई बोलत होते.
याप्रसंगी मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर, कार्यकारी विश्वस्त जुगल राठी यांसह मान्यवर उपस्थित होते. जुन्या पॅनकार्डची सुरुवात, त्याची वैशिष्ट्ये, त्यातील त्रुटी, नवीन पॅनकार्डची आवश्यकता अशा विविध बाबींची सविस्तर माहिती दिली तसेच उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले.
डॉ. सातभाई या वेळी म्हणाले, पॅन कार्डचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत जाणार असून, ज्यांनी अद्याप आधारसोबत पॅन जोडले नसल्यास एक हजार रुपये दंड भरून सलग्नीकरणाची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. ही प्रक्रिया पूर्ण न केल्याने देशात 11.5 कोटी पॅनकार्ड निष्क्रिय झाले आहेत.
सर्व करदात्यांना ई-पॅन सध्या मोफत पुरविले जाणार आहे. विद्यमान पॅनकार्डही आधारसोबत सलग्न असल्यास वैधच राहणार आहे. विद्यमान पॅनधारकांना त्यांचा ईमेल, मोबाईल, पत्ता, नाव, जन्मदिनांकात सुधारणा करायची असल्यास, पॅन 2.0 प्रकल्पांतर्गत विनामूल्य करता येईल.
महाराष्ट्रातील करदात्यांना नवीन पॅनसाठी अर्ज करताना वडिलांच्या नावासोबत आईचेही नाव समाविष्ट करता येईल. विवाहित स्त्रियांनी पॅनसाठी अर्ज करताना पतीचे नाव समाविष्ट करण्याचा आग्रह धरू नये. तसेच सर्वांनी पॅन क्रमांक दुसर्याला देताना पॅन कार्ड देऊ नये, त्याचा दुरुपयोग होण्याची शक्यता असल्याचेही डॉ. सातभाई यांनी या वेळी सांगितले.