वेल्हे: येत्या 19 फेब्रुवारी रोजी साजर्या होणार्या छत्रपती श्रीशिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या राजगड किल्ल्याच्या स्वच्छतेसाठी भोर विभागाच्या प्रांताधिकारी, तहसीलदारांसह राजगड, भोरचे महसूल अधिकारी सरसावले.
सर्वांनी मिळून शुक्रवारी (दि. 14) सकाळी 8 ते दुपारी 12 पर्यंत 4 तासांत तब्बल 25 पोती कचरा गोळा केला. राजगड तालुका महसूल विभागाच्या पुढाकाराने प्रथमच राजगडावर अशा प्रकारचे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
भोर विभागाचे प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, राजगडचे प्रांताधिकारी महेश हरिश्चंद्रे, राजगड तालुका तहसीलदार निवास ढाणे, नायब तहसीलदार मयूर बनसोडे, अरुण कदम, अजिनाथ गाजरे, आदेश धुनाखे, मंडल अधिकारी रतन कांबळे, राजपाल यादव, कैलास बाठे, तलाठी रवीकरण पाटील, हेमंत घोडके यांच्यासह आपत्ती व्यवस्थापनचे तानाजी भोसले, मावळा जवान संघटनेचे कार्याध्यक्ष रोहित नलावडे, राजगड तालुका पत्रकार संघाचे मनोज कुंभार आदी या अभियानात सहभागी झाले होते.
पद्मावती माचीवरील छत्रपती श्रीशिवाजी महाराज यांच्या राजसदरेत ’हर हर महादेव’, ’जय शिवराय’च्या जयघोषात शिवरायांना मानवंदना देत अभियानाला सुरुवात करण्यात आली. बालेकिल्ला, सुवेळा माची, संजीवनी माची, पद्मावती माची, पाल खुर्द प्रवेशद्वार, राजमार्गासह पाऊल वाटा, तटबंदी, ऐतिहासिक वास्तूंवर पडलेल्या प्लास्टिक बाटल्या, कचरा गोळा करण्यात आला.
शिवजयंतीनिमित्त राजगडावर राज्यभरातून हजारो शिवभक्त शिवज्योत घेऊन जातात. त्यांच्या तसेच गडावर येणार्या पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करणार आहेत. जखमी पर्यटकांना तातडीने उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी गडावर व पायथ्याला प्रथमोपचार केंद्र सुरू करण्यात येणार आहे, असे प्रांताधिकारी डॉ. खरात यांनी या वेळी सांगितले.