पुणे : स्वारगेट स्थानकातून एसटीच्या गाड्या सोडताना गोंधळ,अधिकारी- कर्मचारींमध्‍ये बाचाबाची

स्वारगेट येथे एसटीच्यासमोर उभारलेले कर्मचारी
स्वारगेट येथे एसटीच्यासमोर उभारलेले कर्मचारी

पुणे, पुढारी वृत्तसेवा: गेल्या दोन महिन्यांपासून एसटी कर्मचार्‍यांचा सुरू असलेला संप मोडून काढण्याचा प्रयत्न शनिवारी (दि.८) रोजी एसटी प्रशासनाने केला. यावेळी मॅकेनिक विभागातील कर्मचार्‍यांमार्फत तीन गाड्या सोडण्यात येत असताना अधिकारी- कर्मचारी यांच्यात बाचाबाची झाली. आंदोलक कर्मचार्‍यांनी गाड्या रोखण्याचा प्रयत्न केला.

पुणे विभागातील दौड, भोर, बारामतीमधून संप मोडून काढण्यात प्रशासनाला काही प्रमाणात यश आले आहे; परंतु, स्वारगेट स्थानकातील कर्मचारी अजूनही संपावर ठाम आहेत.

आज एसटीच्या पुणे विभागातील अधिकार्‍यांनी चालक उपलब्ध करून स्थानकातील तीन एसटी बस शनिवारी सोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, कर्मचार्‍यांनी याला तीव्र विरोध केला. यावेळी कर्मचारी गाड्यांसमोर बसून राहिले होते.  त्यांनी एसटी प्रशासन मॅकेनिकमार्फत गाड्या सोडून प्रवाशांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप केला. दरम्यान, हे वाद थांबविण्यासाठी स्थानिक पोलिसांना यावेळी मध्यस्थी करावी लागली.

एसटीच्या तीन चालकांमार्फत आम्ही स्वारगेट स्थानकातून ती गाड्या सोडल्या आहेत. यातील २ गाड्या सोलापूरला तर एक गाडी पंढरपूरला रवाना झाली आहे. लवकरच इतर गाड्या आम्ही सोडणार आहोत.
– सचिन शिंदे, आगार व्यवस्थापक, स्वारगेट एसटी स्थानक

एसटी प्रशासन आमचा संप फोडण्यासाठी मॅकेनिकमार्फत गाड्या बाहेर काढत आहेत. मॅकेनिकमार्फत गाड्या बाहेर काढून एसटी प्रशासन प्रवाशांच्या जीवाशी खेळ करत आहे. उद्या प्रवाशांना काही झाल्यास याला जबाबदार कोण?
– राजेश मेश्राम, एसटी कर्मचारी

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news