अल्पवयीन मुलीस कॉलेजमध्ये जात ‘मिकी माउस कशी आहेस.. तू मला आवडतेस’ असे म्हणून अश्लील हावभाव करणार्या दोघांवर वडगाव निंबाळकर पोलिसात याबाबत 17 वर्षीय पीडितेने फिर्याद दिली आहे. अविनाश पवार, तुषार गुलदगड अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगी एका कॉलेजमधून जात असताना पवार याने तिला ‘मिकी माउस कशी आहेस, तू मला आवडतेस’ असे म्हणून अश्लील हावभाव केले. पीडितेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन त्याने केले.
पवार हा सुमारे एक वर्षापासून, तर गुलदगड हा मागील सहा महिन्यांपासून या मुलीचा पाठलाग करून अश्लील इशारे, अश्लील टोमणे मारून वारंवार त्रास देत होता. त्याला कंटाळून मागील दोन महिन्यांपासून फिर्यादीने एसटी बसमधून प्रवास करणे बंद केले होते. या दोघांच्या भीतीमुळे ती महाविद्यालयाच्या एका शिक्षकासोबत त्यांच्या गाडीतून कॉलेजमध्ये जात होती.
आरोपींनी त्यानंतर कॉलेजमध्ये येऊन तिला त्रास देण्यास सुरुवात केली. यामुळे मुलीच्या मानसिक स्थितीवर परिणाम झाला. तिने कॉलेजमधील प्रकार प्राचार्य व शिक्षकांना सांगितला. त्यानंतर पोलिसांत फिर्याद दिली.