

पुणे: नायलॉन मांजा विक्रीवर बंदी असतानाही शहरात अशा मांजाची विक्री होत असल्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. अशा मांजा विक्री करणार्या विक्रेत्यांवर पुणे पोलिसांकडून कडक कारवाई केली जात असून, मांजा विक्रेत्यांबरोबरच मांजा विक्री करणारे डिलर्स आणि मांजा उत्पादक यांच्यावरही पोलिसांनी आता नजर रोखली आहे.
शहरात नायलॉन मांजामुळे अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत, तर काही जणांना जीव गमवावा लागला आहे. कोंढवा बुद्रुक परिसरात नायलॉन मांजामुळे ज्योती कद्रे यांच्यासह दोन महिला जखमी झाल्याची घटना घडली होती. त्याचबरोबर खासगी नोकरी करणार्या आरती अंगारखे यांच्या दुचाकीला मांजा अडकल्याने अपघात होता होता वाचल्या.
प्रशासनाच्या तसेच पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे मांजाने दुखापती होण्याच्या घटना घडत असल्याचे नागरिकांकडून आरोप होत आहेत. त्यामुळे मांजा विक्री करणार्यांवर कारवाई करण्याबाबत लक्ष केंद्रित केले असून, विक्रेत्यांबरोबरच आता मांजा पुरवठा करणारे डिलर्स आणि मांजा उत्पादकांवर कारवाई केली जात आहे.
पतंग काटाकाटीच्या स्पर्धेत मांजा येतोय बाजारात
शहरात प्रामुख्याने डिसेंबर महिन्यापासूच नायलॉन मांजा विक्रीला सुरुवात होते. पंतग उडवताना इतरांच्या पतंगाचा दोर कापण्याच्या स्पर्धेतून नायलॉन मांजा खरेदीकडे नागरिकांचा विशेषत: मुलांचा कल वाढत आहे. त्यामुळेच बंदी असतानाही बाजारात मांजाची चोरून उपलब्धता केली जाते. मुळात ही काटाकाटीची स्पर्धाच संपली तर असा धारदार मांजा बाजारात येणे आपोआप थांबेल.
वर्षभरात चार जणांवर गुन्हे दाखल; पाच अटक
2017 पासून हानिकारक नायलॉन मांजाचे उत्पादन, विक्री व वापरावर बंदी घालण्यात आली आहे. 2023 मध्ये 7 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 2024 मध्ये पोलिसांनी चार गुन्हे दाखल केले आहेत, तर पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
शहरात चोरून नायलॉन मांजाची विक्री करणार्यांवर आम्ही कारवाई करत आहोतच, मात्र त्यांना मांजा पुरवठा करणार्या डिलर्सचा तसेच नायलॉन मांजा निर्मतिी करणार्या उत्पादकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने आदेशही देण्यात आले आहेत.
- शैलेश बलकवडे, अप्पर पोलिस आयुक्त (गुन्हे), पुणे.