पुणे : महापालिकेसाठी तीनसदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय रद्द करून पुन्हा चार सदस्यीय प्रभाग रचना करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला असला, तरी त्यांचा फटका इच्छुकांना बसणार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयानुसार पुण्यातील नगरसेवकांची संख्या 173 होणार होती, आता मात्र नव्या निर्णयाने ही संख्या 166 इतकी होणार आहे. तर चारसदस्यीय प्रभाग 41 व दोन सदस्यांचा एक प्रभाग असे एकूण 42 प्रभागांची नव्याने रचना करावी लागणार आहे.
राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर असताना मुंबई वगळता अन्य महापालिकांसाठी तीनसदस्यीय प्रभागरचना करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हा निर्णय घेताना लोकसंख्येची जणगणना झाली नसल्याने 2011 च्या लोकसंख्येत सरासरी 10 टक्के इतकी वाढ गृहीत धरण्यात आली होती. त्यानुसार प्रत्येक महापालिका क्षेत्रातील लोकसंख्यानुसार नगरसेवकांच्या संख्येत वाढ झाली होती. पुणे महापालिकेतील नगरसेवकांची संख्या 164 वरून 173 वर गेली होती. त्यानुसार तीनसदस्यीय रचनेने तीनचे 57 प्रभाग, तर दोन सदस्यांचा एक असे एकूण 58 प्रभाग करण्यात आले होते. आता मात्र, महायुतीच्या सरकारच्या निर्णयामुळे नव्याने पुन्हा नगरसेवकांची संख्या आणि प्रभागरचना निश्चित होणार आहे.
पुणे महानगरपालिकेची 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या 31 लाख 24 हजार इतकी आहे. मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 च्या 2016 कायद्यातील सुधारित तरतुदीनुसार 30 लाख लोकसंख्येला 161 नगरसेवक व त्यापुढील प्रत्येक 1 लाख लोकसंख्येला 1 नगरसेवक याप्रमाणे नगरसेवकांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार 2017 च्या महापालिका निवडणुकीत नगरसेवकांची एकूण संख्या 162 इतकी होती. मात्र, ऑक्टोबर 2017 ला महापालिकेत 11 गावे समाविष्ट झाली. या गावांच्या 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या दीड लाख इतकी होती.
त्यामुळे पोटनिवडणुकीला नगरसेवकांची संख्या वाढून महापालिकेच्या नगरसेवकांची एकूण संख्या 164 इतकी झाली. त्यानंतर 2021 मध्ये पुन्हा 23 गावांचा महापालिकेत समावेश झाला. या गावांची लोकसंख्या 2 लाख 22 हजार इतकी आहे. त्यामुळे आता पूर्ण महापालिका हद्दीची लोकसंख्या 35 लाख इतकी आहे. कायद्यातील तरतुदीनुसार आता 30 लाख लोकसंख्येमागे 161 नगरसेवक, तर त्यापुढील प्रत्येक 1 लाख लोकसंख्येमागे 1 याप्रमाणे 5 लाख लोकसंख्येमागे 5 नगरसेवक यानुसार नगरसेवकांची एकूण संख्या 166 इतकी होणार आहे, तर 166 लोकसंख्येनुसार चार सदस्यांचे 41, तर दोन सदस्यांचा एक असे एकूण 42 असे प्रभाग नव्याने होणार आहेत.
हेही वाचा