कचरा असलेल्या जागामालकांना नोटीस

कचरा असलेल्या जागामालकांना नोटीस

पुणे ः पुढारी वृत्तसेवा : एकीकडे शहरातील कचर्‍याचे क्रॉनिक स्पॉट कमी करण्यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्न करीत असतानाच खासगी जागांवरील कचरा उचलण्याची वेळ आली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी आता जागामालकांना नोटीस दिली जाणार आहे.
महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने शहरातील कचर्‍याची समस्या सोडविण्यासाठी 'क्रॉनिक स्पॉट' शोधून काढले. सातत्याने एकाच ठिकाणी कचरा टाकण्यात येणारे असे साधारणपणे नऊशे क्रॉनिक स्पॉट आढळून आले होते.

गेल्या चार महिन्यांपासून ते 'स्पॉट'कचरामुक्त करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, स्वच्छ संस्थेचे प्रतिनिधी प्रयत्न करीत आहेत. यामुळे नऊशेपैकी सहाशे 'स्पॉट' हे कचरामुक्त करण्यात यश आले आहे. कचरा टाकण्यात येणार्‍या ठिकाणी महापालिकेचे कर्मचारी लक्ष ठेवून जनजागृती करण्यात आली.

दुसरीकडे शहरातील खासगी मोकळ्या जागेत टाकला जाणारा कचरा हा महापालिकेची डोकेदुखी ठरत आहे. यामुळे या खासगी जागेत मोठ्या प्रमाणावर कचर्‍याचे ढीग लागत आहेत. या कचर्‍याला आग लागणे, तो कुजून दुर्गंधी सुटणे, यातून मार्ग काढण्यासाठी आता महापालिकेने संबंधित जागा मालकांना नोटीस देण्याचा निर्णय घेतला आहे. या जागेवर कोणी कचरा टाकू नये यासाठी उपाययोजना करावी, कुंपण घालावे, अशा विविध सूचना जागामालकांना केल्या जाणार असल्याचे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी सांगितले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news