

Nitesh Rane supports ink attack: वारकरी संप्रदायातील 'घुसखोर' कोण, या वादावरून शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर आळंदीत शाईफेक करण्यात आली आहे. या घटनेनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण प्रचंड तापले असून, भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी या शाईफेकीचे जाहीर समर्थन केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
विकास लवांडे यांच्यावर कीर्तनकार संग्राम भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शाईफेक केल्यानंतर नितेश राणे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या घटनेला पाठिंबा दिला. राणे यांनी फेसबुकवर पोस्ट करत म्हटले की, "बापू अभिमान आहे, जय श्रीराम!" या पोस्टद्वारे त्यांनी संग्राम भंडारे यांच्या कृतीचे समर्थन करत शरद पवार यांच्या समर्थकांना डिवचले आहे.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने गेल्या काही दिवसांपासून वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारांची घुसखोरी होत असल्याचा आरोप करत एक मोहीम उघडली होती. विकास लवांडे यांनी अशा 'घुसखोरांची' एक यादी जाहीर केली होती, ज्यात ह.भ.प. संग्राम भंडारे यांच्या नावाचा समावेश होता. याचाच राग धरून भंडारे आणि त्यांच्या १५-२० सहकाऱ्यांनी लवांडे यांची गाडी लोणी काळभोर परिसरात अडवून त्यांच्यावर शाईफेक केली.
या हल्ल्यानंतर विकास लवांडे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात धाव घेतली. "काही गुंडांनी मला निर्जन स्थळी अडवून धक्काबुक्की केली आणि शाई फेकली. त्यांच्याकडे रिव्हॉल्व्हर देखील होते," असा गंभीर आरोप लवांडे यांनी केला आहे. जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत पोलीस ठाण्यातच सत्याग्रह करण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे. दुसरीकडे, वारकरी संप्रदायातील संतांचा अपमान करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठीच हा संताप व्यक्त झाल्याचे संग्राम भंडारे यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.