पुणे: सिंहगड रस्त्यावरील धायरी परिसरातील रायकर मळा येथे श्री ज्वेलर्स या सराफ पेढीवर मंगळवारी पडलेल्या दरोड्याचा थरार आता बनावट असल्याचे उघडकीस आले आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या दुकान मालकानेच हा बनाव तिसरा आरोपी असलेल्या चुलत भावलाच हाताशी धरून बनाव रचल्याचे रचल्याचे गुन्हे शाखेच्या तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली आहे.
धायरीतील काळुबाई चौकात असलेल्या श्री ज्वेलर्समध्ये मंगळवारी (दि. 15) दुपारी ग्राहकांची वर्दळ कमी असताना, तीन अनोळखी व्यक्तीं शिरल्या होत्या. त्यांनी दुकान मालक विष्णू सखाराम दहिवाल आणि एका कामगाराला पिस्तुलचा धाक दाखवत 22 तोळे सोन्याचे दागिने लांबवले. पळून जात असताना कर्मचार्यांनी प्रतिकार केला असता, त्यांच्या हातातील पिस्तुल खाली पडले. तत्काळ आरोपींनी दुचाकीवरून पलायन केले.
आरोपींना अटक, बनाव उघड
पोलिस तपासात सुरुवातीला हा प्रत्यक्ष दरोडा वाटत असला, तरी गुन्हे शाखेने सखोल तपास करताना दोन आरोपींना अटक केली. चौकशीत त्यांनी आश्चर्यचकित करणारी माहिती दिली. हे कृत्य त्यांनी सरळसरळ कुणाच्यातरी सांगण्यावरून केले होते. यानंतर पोलिसांनी त्या तिसर्या व्यक्तीचा शोध घेतला असता, तो सराफ व्यावसायिक विष्णू दहिवाल याचाच चुलत भाऊ असल्याचे समोर आले. पुढील चौकशीत त्याने कबुली दिली की, आर्थिक अडचणीत सापडलेल्या दहिवालनेच त्याला हे नाटक रचण्यास सांगितले होते.
देणे थकल्यामुळे ‘सहानुभूती’ मिळवण्याचा प्रयत्न
दहिवाल याच्यावर सुमारे 20 ते 25 लाख रुपयांचे देणे थकले होते. त्यामुळे देणेकर्यांकडून सहानुभूती मिळावी आणि काही काळाची उसंत मिळावी या उद्देशाने त्याने स्वतःच्या दुकानावर बनावट दरोडा घडवून आणला. यासाठी प्लास्टिक पिस्तुलाचा वापर करण्यात आला होता.