निरा नदीवरील नवीन रेल्वेपूल सुरक्षिततेच्या द़ृष्टीने धोकादायक? एक्स्प्रेसचा वेग होतोय कमी
पुरंदर तालुक्यातील निरा नदीवर बांधलेल्या नवीन पुलावरून जाताना एक्स्प्रेस, सुपरफास्ट गाड्यांचा वेग कमी केला जात असल्याचे दिसत आहे. पूल नवीन कोरा करकरीत असताना असे का होते? याचे मोठे गौडबंगाल आहे.
निरा रेल्वेस्थानकाजवळ निरा नदीवर रेल्वे प्रशासनाने जुन्या पुलाजवळ नवीन पूल बांधला खरा; मात्र रेल्वेच्या संबंधित अधिकार्याने निरा रेल्वेस्थानकातील जागेच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार न करता जुन्या पुलाला समांतर असा नवीन पूल बांधणे गरजेचे होते. मात्र, तसे न करता काही प्रमाणात तिरका पूल बांधला गेला आहे. याबाबत अनेक प्रवासी, ग्रामस्थ उलटसुलट चर्चा करीत आहेत. रेल्वेच्या सुरक्षा विभागानेही पूल सुरू करण्यापूर्वी नवीन पुलावरून गाडीची चाचणी घेऊन पूल वाहतुकीसाठी सुरू करण्याकरिता मध्य रेल्वेला हिरवा कंदील दिला.
सुपर फास्ट गाड्या तसेच पुणे-कोल्हापूर वंदे भारत एक्स्प्रेससारख्या गाड्या कोल्हापूरकडे जाताना निरा नदीच्या जुन्या पुलावरून 100 ते 110 किमीच्या वेगाने जात असतात. नवीन तंत्रज्ञानाने विकसित केलेल्या निरा नदीवरील नवीन पुलावरून एक्स्प्रेस व कोल्हापूर-पुणे वंदे भारत रेल्वेगाड्या जाताना अत्यंत कमी वेगाने का जातात? नवीन पुलाचे काम दर्जेदार झाले नाही का? रेल्वेच्या संबंधित अधिकार्याने व ठेकेदाराने पुलाचे काम व्यवस्थित केले नाही का? असे अनेक प्रश्न प्रवाशांसह ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत. रेल्वे प्रशासनाकडून नवीन पूल जुन्या पुलाला समांतर न बांधता तिरका का बांधला गेला? याची दखल रेल्वेचे वरिष्ठ प्रशासन घेईल का? भविष्यात नवीन पूल सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक होऊ शकतो का? अशी दबक्या आवाजात चर्चा ग्रामस्थ करीत आहेत.
नवीन पुलाचे बांधकाम तिरके
निरा नदीवर सन 1884 सालचा कोल्हापूरकडे जाणारा जुना ब्रिटिशकालीन पूल आहे. याच पुलालगत उजवीकडील बाजूला नवीन पूल उभारला गेला. दोन्ही पुलांमध्ये दक्षिणेस 35 फूट तर उत्तरेकडे अंदाजे 50 फूट अंतर आहे. त्यामुळे जुन्या पुलाला नवीन पूल समांतर दिसत नाही. नवीन पुलाचे बांधकाम तिरके झाल्याचे दिसून येते. नवीन पुलावरून पुण्याकडे जाताना रेल्वेमार्गाला वळण असल्याने रेल्वेगाड्यांचा वेग ताशी 30 किलोमीटर इतका कमी केला जातो. तर जुन्या ब्रिटिशकालीन पुलावरून कोल्हापूरकडे काही रेल्वेगाड्या ताशी 100 हून अधिक किलोमीटर वेगाने जातात.